Pak vs Ban 2nd Test : चौथ्या दिवशी पावसाने वाचवले, मात्र पाचव्या दिवशी पाकिस्तानचा होणार खेळ खल्लास? बांगलादेश इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर
पाकिस्तान क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना हरण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि असे झाल्यास बांगलादेश संघ इतिहास रचेल.
Pakistan vs Bangladesh 2nd Test : पाकिस्तान क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना हरण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि असे झाल्यास बांगलादेश संघ इतिहास रचेल. रावळपिंडीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत असून ही कसोटी जिंकण्यासाठी त्यांना 185 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
बांगलादेशला विजयासाठी 143 धावांची गरज
चौथ्या दिवशी चहापानानंतर पाऊस पडला, त्यामुळे पाकिस्तानचा संघ सध्या पराभवापासून वाचला आहे. दिवसाचा खेळ संपल्यानंतर बांगलादेश संघाने बिनबाद 42 धावा केल्या असून आता सामना जिंकण्यासाठी आणखी 143 धावांची गरज आहे, यासोबत पाहुण्या संघाकडे 10 विकेट शिल्लक आहेत. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही, त्यानंतर चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे लवकर आटोपला. आता एक दिवसाचा खेळ बाकी असून बांगलादेशने सावध फलंदाजी केल्यास विजयासह इतिहास रचला जाईल.
दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सैम अयुब, शान मसूद आणि आगा सलमान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात 274 धावा केल्या. पाकिस्तानने पहिल्या डावात केलेल्या 274 धावांना प्रत्युत्तर देताना लिटन दासच्या 138 धावा आणि मेहदी हसन मिराझच्या 78 धावांच्या जोरावर बांगलादेश संघाने 262 धावा केल्या आणि पाकिस्तानला 12 धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात शान मसूदचा संघ 172 धावांवर ऑलआऊट झाला आणि यजमान पाकिस्तान संघाला 184 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत पाकिस्तानच्या सर्व 10 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून आगा सलमानने 47 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली तर मोहम्मद रिझवानने 43 धावांचे योगदान दिले. बाबर आझम पुन्हा फ्लॉप झाला आणि पहिल्या डावात 31 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने केवळ 11 धावा केल्या. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात हसन महमूदने 5, नाहिद राणाने 4 तर तस्किन अहमदने एक विकेट घेतली.
बांगलादेश इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर
बांगलादेशने मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव केला होता. बांगलादेशने पाकिस्तान संघाविरुद्ध कसोटी सामना जिंकण्याचीही ही पहिलीच वेळ होती. 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेश 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे उद्या पाचव्या दिवशी खराब हवामानामुळे खेळ झाला नाही तरी बांगलादेश मालिका 1-0 ने जिंकून इतिहास रचणार आहे.