(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Kane Passed Away : अॅथलेटिक्स प्रशिक्षक भाऊ काणे यांचं निधन; 75व्या वर्षी अखेरचा श्वास, क्रिडाविश्वात हळहळ
Sanjay Kane Passed Away : भाऊ काणे यांनी आपल्या कारकीर्दीत नागपूरमधून 11 आंतरराष्ट्रीय ॲथलिट्स घडवले. चारुलता नायगावकर, अपर्णा भोयर आणि माधुरी गुरनुले या भाऊंच्या शिष्यांनी ॲथलेटिक्समध्ये नागपूरचं नाव मोठं केलं.
Famous Athletics Coach of Nagpur Sanjay Kane Passed Away : नागपूर : नागपूरचे (Nagpur News) प्रख्यात ॲथलेटिक्स (Athletics) प्रशिक्षक संजय उर्फ भाऊ काणे (Bhau Kane) यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं रविवारी रात्री निधन झालं. त्यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भाऊ काणे यांनी आपलं अख्खं आयुष्य क्रीडाक्षेत्रासाठी वेचलं. त्यांनी ॲथलेटिक्स प्रशिक्षणाला पूर्ण वेळ देता यावा म्हणून 2009 साली स्टेट बँकेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. भाऊ काणे यांनी आपल्या कारकीर्दीत नागपूरमधून 11 आंतरराष्ट्रीय ॲथलिट्स घडवले. चारुलता नायगावकर, अपर्णा भोयर आणि माधुरी गुरनुले या भाऊंच्या शिष्यांनी ॲथलेटिक्समध्ये नागपूरचं नाव मोठं केलं.
भाऊ काणे यांच्या ॲथलेटिक्समधल्या कार्याचा राज्य शासनानं दादोजी कोंडदेव पुरस्कारानं गौरव केला होता. भाऊंनी स्थापन केलेल्या नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाचा गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला सुवर्णमहोत्सव साजरा झाला. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाला भविष्यात काय करता येईल, याची आपल्या सहकाऱ्यांशी ते वेळोवेळी चर्चा करत होते. त्यामुळं त्यांच्या निधनानं राज्यातील ॲथलेटिक्स चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
नागपूर आणि विदर्भातील खेळाडूंना घडवणारे हाडाचे प्रशिक्षक भाऊ काणे यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारा व्रतस्थ ऋषी आपण गमावला आहे. भाऊंनी आपल्या कौशल्य, जिद्द आणि परिश्रमाने नागपूरमध्ये ११हून जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले. शहरात क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी भाऊ…
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) March 17, 2024
भाऊ काणे यांच्या जाण्यानं क्रिडाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही भाऊ काणे यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. नितीन गडकरींनी ट्वीट केलंय की, "नागपूर आणि विदर्भातील खेळाडूंना घडवणारे हाडाचे प्रशिक्षक भाऊ काणे यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारा व्रतस्थ ऋषी आपण गमावला आहे. भाऊंनी आपल्या कौशल्य, जिद्द आणि परिश्रमाने नागपूरमध्ये 11हून जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले. शहरात क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी भाऊ काणेंनी दिलेले योगदान नागपूरकर कधीही विसरू शकणार नाहीत. भाऊ काणेंना माझी विनम्र श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या परिजनांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती"