Asian Games 2018 : अरपिंदर सिंगचं तिहेरी उडीत सुवर्णपदक
अरपिंदरनं चौथ्या प्रयत्नात 16.77 मीटरची उडी घेत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. एशियाडमधलं भारताचं हे दहावं सुवर्ण पदक ठरलं.
जकार्ता : भारताच्या अरपिंदर सिंगनं एशियाडमध्ये तिहेरी उडीत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. यंदाच्या एशियाडमधलं भारताचं हे दहावं सुवर्ण पदक ठरलं. अरपिंदरनं चौथ्या प्रयत्नात 16.77 मीटरची उडी घेत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. अरपिंदर सिंगनं याआधी 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.
उजबेकिस्तानच्या कुर्बानोव रुसलानने तिहेरी उडीत 16.62 मीटर उडी घेत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. तर चीनच्या चाओ शूने 16.56 मीटर उडी घेत कांस्य पदक जिंकलं आहे. यंदाच्या एशियाडमध्ये भारतीय अॅथलेटिक्सने चांगली कामगिरी केली आहे.
भारताच्या द्युती चंदनं एशियाडमध्ये महिलांच्या 200 मीटर्स शर्यतीत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. यंदाच्या एशियाडमधलं द्युतीचं हे दुसरं पदक ठरलं. द्युतीनं 23.20 सेकंदाची वेळ देत रौप्यपदकाची कमाई केली. बहारिनच्या एडिडिऑन्गनं 22.96 वेळेसह सुवर्णपदक पटकावलं तर चीनची वेई योन्गली कांस्यपदकाची मानकरी ठरली. द्युतीनं याआधी शंभर मीटर शर्यतीचंही रौप्यपदक पटकावलं होतं.
शरथ कमल आणि मनिका बत्राला एशियाडमध्ये टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या वांग सून आणि यींगशा सून या जोडीनं उपांत्य फेरीत शरथ आणि मनिकाचा 4-1 अशा फरकानं पराभव केला. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत भारतानं कोरियावर 3-2 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली होती.
भारताच्या खात्यात 53 पदकं एशियाड स्पर्धेत भारत 53 पदकांसह नवव्या स्थानावर आहे. यामध्ये 10 सुवर्ण, 20 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश आहे. 101 सुवर्णपदकांसह 215 पदकं जिंकणारा चीन स्पर्धेत अव्वल स्थानी आहे.