IND vs KOR : भारताने दक्षिण कोरियाला पाजले पराभवाचे पाणी; थाटात गाठली अंतिम फेरी, फायनलमध्ये चीनशी भिडणार
Asian Champions Trophy 2024 India vs South Korea 2nd Semifinal : आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात खेळला गेला.
Asian Champions Trophy 2024 India vs South Korea 2nd Semifinal : आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव करत थाटात अंतिम फेरी गाठली. मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना यजमान चीन संघाशी होणार आहे, ज्याने पाकिस्तानला पराभूत करून प्रथमच अंतिम फेरी गाठली होती.
दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताकडून उत्तम सिंग, हरमनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग यांनी गोल केले. त्याचवेळी दक्षिण कोरियासाठी यांग जिहुनने (33वे मिनिट) एकमेव गोल केला. भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव करत स्पर्धेतील विजयी मोहीम सुरू ठेवली.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गतविजेत्या भारताने सामन्याची सुरुवात आक्रमक शैलीत केली. 13व्या मिनिटाला भारताचा स्टार खेळाडू उत्तम सिंगने कोरियाचा किल्ला फोडला आणि अप्रतिम गोल करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने आपला उत्कृष्ट खेळ सुरू ठेवला. 19व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, जो भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोलपोस्टमध्ये लावण्यात किंचितही चूक केली नाही. यादरम्यान कोरियन संघाला अनेक सोप्या संधी मिळाल्या, मात्र गोल करण्यात ते अपयशी ठरले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये कर्णधाराने केलेल्या शानदार गोलमुळे भारताने हाफ टाइमपर्यंत 2-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
भारत आणि कोरिया यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्याचा तिसरा क्वार्टर खूपच रोमांचक झाला. या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहिला मिळाली. भारतीय संघाचा स्टार खेळाडू जर्मनप्रीत सिंगने 32 व्या मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करत भारताची आघाडी 3-0 अशी वाढवली. पण, पुढच्याच मिनिटाला कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यावर यांग जिहुनने चमकदार कामगिरी करत फरक कमी केला. 45व्या मिनिटाला कोरियाच्या गोलरक्षकाला येलो कार्ड देण्यात आले आणि भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यावर भारताचा 'सरपंच' हरमनप्रीत सिंगने शानदार गोल करत भारताला 4-1 अशी आघाडी मिळवून दिली.
कोरियाने सामन्यात पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण शेवटी भारतीय संघाने कोरियाचा 4-1 असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली.
हे ही वाचा -