मॅचविनर फलंदाज असतानाही टीम इंडियावर ही वेळ का?, आशिया चषकातून बाहेर पडण्याची प्रमुख तीन कारणे
Team India Asia Cup 2022 : कर्णधार रोहित शर्मासह लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंतसारखे पाच पाच मॅचविनर फलंदाज हाताशी असतानाही टीम इंडियावर ही वेळ यावी?
Team India Asia Cup 2022 : भानुका राजपक्षे आणि दासुन शनाका यांच्या फिनिशिंग टचच्या जोरावर श्रीलंकेनं भारताचा सहा गड्यांनी पराभव केला. रोहित शर्माच्या भारतीय संघाचा हा सुपर फोरमधला सलग दुसरा पराभव ठरला. आधी पाकिस्तान आणि मग श्रीलंका. त्यामुळं टीम इंडियाचं आशिया चषकातलं आव्हानच जवळजवळ संपुष्टात आलं आहे. कर्णधार रोहित शर्मासह लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंतसारखे पाच पाच मॅचविनर फलंदाज हाताशी असतानाही टीम इंडियावर ही वेळ यावी? आशिया चषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात येण्याची तीन प्रमुख कारणे आहेत.. पाहूयात
भारताच्या प्रमुख फलंदाजांच्या कामगिरीतला सातत्याचा अभाव हे टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीचं पहिलं कारण आहे. एकट्या विराट कोहलीचा अपवाद वगळला भारताच्या एकाही फलंदाजानं आशिया चषकात सातत्यानं धावा केलेल्या नाहीत. पण भरवशाच्या त्या विराटला श्रीलंकेसमोर भोपळा ही फोडता आला नाही. लोकेश राहुल तर इतका चाचपडतोय की, त्याला चार सामन्यांमध्ये मिळून केवळ 70 धावाच करता आल्या आहेत.
भारतीय आक्रमणातला हरवलेला डंख हे टीम इंडियाच्या अपयशाचं दुसरं कारण आहे. जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेलच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजांनी सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला स्वस्तात गुंडाळण्याचा चमत्कार घडवला. पण पुढच्या सामन्यांमध्ये भारतीय आक्रमणाची ती धार हरवलेली दिसली. सुपर फोर सामन्यांमध्ये दीपक हूडासारखा ऑफ स्पिनर हाताशी असतानाही कर्णधार रोहित शर्मानं त्याचा वापर करण्याचं का टाळलं, हा प्रश्नच आहे.
रवींद्र जाडेजाची दुखापत आणि अष्टपैलू खेळाडूंचं अपयश टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीचं तिसरं कारण ठरलं. रवींद्र जाडेजाला झालेल्या दुखापतीमुळं भारतीय संघात समतोल साधणारा मोठा दुवा हरवला आहे. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या तिन्ही भूमिकांमध्ये जाडेजा हा अस्सल मॅचविनर आहे. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत आपल्यावरच्या दुहेरी भूमिकेला सातत्यानं न्याय देऊ शकलेले नाहीत. त्यामुळं सुपर फोरच्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला मोठं लक्ष्य उभारताना 10-15 धावा कमी पडल्या.
विश्वचषकाआधी भारतीय संघ उणिवा दूर करणार का?
युएईतल्या आशिया चषकात ठळकपणे दिसून आलेल्या भारतीय संघातल्या उणिवा जादूची कांडी फिरवल्यासारख्या तातडीनं दूर करता येणार नाहीत. पण ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आव्हान लक्षात घेता या उणिवांवर उपाययोजना करण्यासाठी बीसीसीआयच्या हाताशी केवळ एकच महिना आहे. ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाला गेल्या काही वर्षांत वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकांवर आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळंच विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. आता आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे विश्वचषकांत भारताच्या कामगिरीत सुधारणा करायची असेल, तर बीसीसीआय आणि सीनियर निवड समितीलाही आपल्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे.