IND vs AFG Match Preview: आशिया चषकात भारताचा आज अखेरचा सामना, टीम इंडियासमोर अफगाणिस्तानचं आव्हान
Asia Cup 2022 Super 4 IND vs AFG : अफगाणिस्तान आणि भारतीय संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. दोन्ही संघाचा आज औपचारिक सामना होणार आहे.
Asia Cup 2022 Super 4 IND vs AFG : पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानचा एक विकेटनं पराभव केला. पाकिस्तानच्या विजयासह भारताचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये प्रत्येकी दोन दोन सामने जिंकत फायनलचं तिकिट मिळवलं आहे. अफगाणिस्तान आणि भारतीय संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. दोन्ही संघाचा आज औपचारिक सामना होणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आशिया चषकात आपेक्षित खेळ करता आला नाही. गतविजित्या भारतीय संघाला सुपर 4 फेरीत सलग दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि अफगाणिस्तान संघाला सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. आशिया चषकात भारताला गोलंदाजी आणि फलंदाजीत सातत्य राखता आलं नाही. भारताचा मध्यक्रम अपयशी ठरला तसेच अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. तसेच क्षेत्ररक्षणातील काही चुकाही महागड्या ठरल्या. टीम इडिंयाने या चुकांमधून धडा घेणे गरजेचे आहे. अफगाणिस्तानचा पराभव करत आशिया चषकाचा शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. अफगाणिस्तानकडे आक्रमक फलंदाजांचा भरणार आहे. त्याशिवाय दर्जोदार फिरकी गोलंदाजीही त्यांची ताकद आहे. भारताविरोधात धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता अफगाणिस्तानमध्ये आहे. त्यामुळे आजचा सामना औपचारिक असला तरी अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. पाकिस्तानविरोधात पहिल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिकला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. त्याशिवाय सूर्यकुमार यादव, राहुल, दीपक हुडा आणि ऋषभ पंत यांनाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या सर्वांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. आशिया चषकात अफगाणिस्तानचा युवा रहमनुल्ला गुरबाझने आपल्या फलंदाजीनं सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याला रोखण्याचे भारतीय गोलंदाजांपुढे आव्हान असेल. मधल्या फळीत नजीबुल्ला आणि इब्राहिम झादरान यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल. गोलंदाजीची मदार रशीद खान, मुजीब उर रहमान या फिरकीपटूंसह डावखुरा वेगवान गोलंदाज फझलहक फरूकी यांच्यावर असेल.
विश्वचषकाआधी भारतीय संघ उणिवा दूर करणार का?
युएईतल्या आशिया चषकात ठळकपणे दिसून आलेल्या भारतीय संघातल्या उणिवा जादूची कांडी फिरवल्यासारख्या तातडीनं दूर करता येणार नाहीत. पण ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आव्हान लक्षात घेता या उणिवांवर उपाययोजना करण्यासाठी बीसीसीआयच्या हाताशी केवळ एकच महिना आहे. ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाला गेल्या काही वर्षांत वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकांवर आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळंच विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. आता आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे विश्वचषकांत भारताच्या कामगिरीत सुधारणा करायची असेल, तर बीसीसीआय आणि सीनियर निवड समितीलाही आपल्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे.