हीच ती वेळ! राहुलला कर्णधार बनवण्याची : अनिल कुंबळे
किंग्स इलेव्हन पंजाबने कर्णधार रविचंद्रन अश्विनला दिल्ली कॅपिटल्स संघाकडे सोपवलं आहे. त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबला नवा कर्णधार शोधावा लागणार आहे. सर्वांची अपेक्षा होती की, सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुल याच्याकडे पंजाबच्या संघाची धुरा सोपवावी. त्याप्रमाणे कर्णधारपदाची माळ राहुलच्या गळ्यात पडली आहे.
मुंबई : मागील आठवड्यात इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामाचा लिलाव पार पडला. यावेळी प्लेअर ट्रान्सफर विंडोद्वारे किंग्स इलेव्हन पंजाबने कर्णधार रविचंद्रन अश्विनला दिल्ली कॅपिटल्स संघाकडे सोपवलं आहे. त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबला नवा कर्णधार शोधावा लागणार आहे. सर्वांची अपेक्षा होती की, सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुल याच्याकडे पंजाबच्या संघाची धुरा सोपवावी. त्याप्रमाणे कर्णधारपदाची माळ राहुलच्या गळ्यात पडली आहे.
किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना राहुलच्या निवडीबाबत विचारले असता, कुंबळे म्हणाले की, राहुल एक लीडर म्हणून तसेच खेळाडू म्हणून विकसित होऊ लागला आहे. आम्ही याअगोदरपासून त्याच्यावर जबाबदारी सोपवण्यासाठी उत्सुक होतो. आता तो जबाबदारी पेलण्यास सक्षम असल्याचे जाणवू लागले आहे. त्यामुळे राहुलच्या खांद्यावर संघाची धुरा सोपवण्याची हीच वेळ आहे. तसेच संघाची जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी राहुलपेक्षा दुसरा खेळाडू पंजाबकडे नाही. त्यामुळे ही जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे.
राहुल एक चांगला फलंदाज आहे. त्याचं यष्टीरक्षणही खूप सुधारलं आहे. त्याचं संघात वजन वाढलंय, त्याच्या शब्दाला किंमत आहे. तसेच उदयोन्मुख खेळाडूंसाठी तो रोल माडेल ठरेल. आयपीएलच्या मागील पर्वात तो पंजाबचा सर्वोत्तम फलंदाज ठरला होता. पंजाबकडून सर्वाधिक धावा त्यानेच केल्या होत्या. तसेच टीम इंडियासाठी खेळताना त्याने 2019 चं वर्ष गाजवलं आहे. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आयपीएलच्या आगामी मोसमात तो चांगली कामगिरी करु शकेल.
किंग्स 11 पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रवी अश्विनला दिल्ली कॅपिटल्सने घेतल्यानंतर आम्ही सर्वप्रथम पाहिलं की, आमच्याकडे कोणकोणते पर्याय आहेत? त्यानंतर आम्ही त्यापैकी एकाची निवड केली. के. एल. राहुल गेल्या दोन वर्षांपासून आमच्या संघासोबत आहे. तो केवळ स्टार फलंदाच नाही तर तो जबाबदारी पेलण्यासही सक्षम आहे.
राहुलला 2018 च्या आयपीएल सीजनपूर्वी किंग्स 11 पंजाबने 11 कोटी रुपयांमध्ये आपल्याकडे खेचले होते. पंजाबसाठी सलामीवीराची भूमिका निभावणाऱ्या राहुलने 2018 च्या पर्वात 659 धावा कुटल्या होत्या. तर मागील वर्षी राहुलने 593 धावा फटकावल्या. दोन्ही वर्षी तो सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 10 यादीत होता. दोन्ही पर्वांमध्ये मिळून राहुलने 12 अर्धशतकं ठोकली आहेत. तर त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे पंजाबच्या संघाला यावर्षी राहुलकडून खूप अपेक्षा आहेत.