National Games 2022 : महाराष्ट्राचं सुवर्णपदकाचं खातं उघडलं, पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये नेमबाज रुद्रांक्ष पाटीलचा सुवर्णवेध
National Games 2022 : नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने शुक्रवारी 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांक्षने फायनलमध्ये अचूक नेम धरत 17 गुणांची कमाई केली.
National Games 2022 : ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने शुक्रवारी (30 सप्टेंबर) 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये (36th National Games 2022) सुवर्णपदकाचा (Gold Medal) वेध घेतला. त्याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. यासह त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांक्षने फायनलमध्ये अचूक नेम धरत 17 गुणांची कमाई केली. यासह किताबाचा मानकरी ठरला.
रुद्रांक्ष पाटील हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सुपुत्र आहे. लहानपणापासूनच रुद्रांक्षच्या आई-वडिलांनी अथक परिश्रम घेऊन हे शिखर गाठण्यासाठी त्याला मदत केली आहे
महाराष्ट्र संघाचा युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने पात्रता फेरीमध्ये सर्वोत्तम कामगिरी सादर फायनल गाठली होती. यंदाच्या सत्रातील सर्वोत्तम कामगिरीमुळे तो या गटामध्ये किताबाचा दावेदार मानला जात होता. हाच विश्वास सार्थकी लावत त्याने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. आगामी कैरो येथील आयोजित आणि चॅम्पियनशिपमध्ये तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. यातून त्याला आपली लय कायम ठेवत नॅशनल गेम्समध्ये सुवर्णपदकाचा यशस्वीपणे वेध घेता आला.
रुद्रांक्षची कामगिरी कौतुकास्पद
महाराष्ट्राचा युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने फायनलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत त्याने सुवर्णपदक जिंकले. त्याने याच सुवर्णपदकातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातून महाराष्ट्राच्या नावे पहिल्या सुवर्णपदकाची नोंद झाली. त्याचीही कामगिरी निश्चितपणे युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी रुद्रांक्षवर कौतुकाचा वर्षाव केला.
रुद्रांक्षचे सोनेरी यश अभिमानास्पद
महाराष्ट्र संघातील आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने सुवर्णपदक जिंकण्याची केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. त्याचेही यश खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहे. सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली सोनेरी यशाची कामगिरी करत तो स्वतःची क्षमता सिद्ध करत आहे. दर्जेदार नेमबाज म्हणून आज त्याने आपला ठसा उमटवला, अशा शब्दात संघटनेच्या जनरल सेक्रेटरी शीला यांनी रुद्रांक्ष खास कौतुक केले.
पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीड स्पर्धेचं उद्घाटन
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल (29 सप्टेंबर) झालं. गुजरातमधील मोटेरा इथल्या जागतिक दर्जाच्या स्टेडियमवर हा शानदार सोहळा झाला. तेरा दिवसांच्या या स्पर्धेत खेळाडू आपलं कौशल्य दाखवणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धा 2015 नंतर प्रथमच होत आहेत. विविध कारणांनी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. गोव्यात होणारी ही स्पर्धा आता गुजरातमध्ये सुरु आहे.