Yavatmal News: परीक्षेचा तणाव असह्य? MBBS विद्यार्थीनीचा गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न
Yavatmal News: एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
Yavatmal News: यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (Shri Vasantrao Naik Government Medical College Yavatmal) येथील एका शिकाऊ महिला डॉक्टरने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या मागील कारण अद्यापही अस्पष्ट असून परीक्षेचा तणाव असह्य झाल्याने हे पाऊल उचलण्यात आले असावे अशी चर्चा आहे. ही विद्यार्थीनी एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.
कल्याणी शिवणकर (वय 22) असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती मूळची नागपूर (Nagpur) येथील आहे. आज, सायंकाळच्या सुमारास वसतिगृहातील खोलीमध्ये तिने गळफास लावला. ही घटना लक्षात येताच तिला खाली उतरवून रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती धोक्याबाहेर असून या घटनेबाबत रुग्णालयात कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे.
या घटनेबाबत अधिकृतपणे माहिती देण्यास कोणीही तयार नाही. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यामागील कारण अजूनही पुढे आले नाही. परीक्षेच्या तणावातून आत्महत्येचा हा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.
आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल होणार?
या प्रकरणी शहर पोलिसांकडून तपास सुरु असून आत्महत्या केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 5 जानेवारीला शिकाऊ डॉक्टरवर चाकू हल्ला झाला होता त्यामुळे पुन्हा एक शिकाऊ डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येच्या प्रयत्नामागे परीक्षेचा तणाव हे कारण होते की अन्य काही कारण होते, याबाबतही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
डॉक्टरांवर झाला होता प्राणघातक हल्ला
काही दिवसांपूर्वीच या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर एका रुग्णाने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले होते. त्यातील एकजण थोडक्यात बचावला. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या रुग्णाला अटक केली.
शुल्लक कारणातून डॉक्टरची हत्या
यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टर अशोक पाल या MBBS च्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास मेडिकल परिसरातील रस्त्यावर हत्या झाली होती. दुचाकीवरून येणाऱ्यांचा धक्का लागल्याने डॉ. अशोक आणि त्या दुचाकीवरील तिघांचा शाब्दीक वाद झाला आणि त्यानंतर दुचाकी वरील एका आरोपीने डॉ. अशोक ला धारधार चाकूने छातीत आणि पोटात वार करून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.