Lok Sabha Election 2024 : 'लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदी अन् फडणवीस विरोधी लाटा'; असीम सरोदेंचा मोठा दावा
Asim Sarode : सर्वात जास्त संविधान विरोधी कामं जर कुठे झाली असतील तर ती महाराष्ट्रात झाली आहेत. हेच महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलं, असे अॅड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) ४ जून रोजी जाहीर झाला. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti vs Mahavikas Aghadi) यांच्या प्रमुख लढतीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. या निवडणुकीच्या अनुषंगाने कायदेतज्ञ असीम सरोदे (asim sarode) यांनी केलेला दावा चर्चेत आहे. राज्यात नरेंद्र मोदी (Narendra Modi) विरोधी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरोधी या दोनच लाटा होत्या, असा दावा सरोदे यांनी केला.
अलीकडच्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडी सरकारमधून बंड करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केलं. 'आम्हीच खरी शिवसेना' असा दावा सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून केला जातो. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून या संदर्भात न्यायालयात धाव घेण्यात आली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेला निकाल आणि भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुती आघाडीच्या असलेल्या या सरकारवर देखील सरोदे यांनी टीका केली आहे.
त्यांनी संविधानाशी द्रोह केलाय
असीम सरोदे म्हणाले की, हे सरकार बेकायदेशीर आहे. राहुल नार्वेकर यांनी सांगितलं, "हा पक्षांतर बंदीचा वाद नसून तो पक्षांतर्गत वाद आहे. आपण नागरिक म्हणून नार्वेकर यांना प्रश्न विचारला पाहिजे की जर तुम्ही हा विषय सहाव्या शेड्युलनुसार हाताळू शकत नव्हता तर मग सर्वोच्च न्यायालयाला तसं पत्र का दिलं नाही ? बेकायदेशीर सरकार बनवलं. त्यांनी संविधानाशी द्रोह केला आहे. राहुल नार्वेकर, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे संविधानाचे गुन्हेगार आहेत. त्यांना संविधानचं बदलायचं आहे, असा माझा आरोप असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
राज्यात मोदी-फडणवीस विरोधी या दोनच लाटा
राजीव गांधी यांच्या सरकारने पक्षांतर बंदी कायदा आणला. हा कायदा पक्षांतर होऊ नये यासाठी आणण्यात आला आहे. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केलं, देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेक मुलाखतीत आम्ही पक्ष फोडून पुन्हा आलो, असा दावा केला. सर्वात जास्त संविधान विरोधी कामं जर कुठे झाली असतील तर ती महाराष्ट्रात झाली आहेत. हेच महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलं. देवेंद्र फडणवीस हे सध्या कुरूप झाले आहेत. अशी प्रतिक्रिया सरोदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर यावेळी महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विरोधी आणि देवेंद्र फडणवीस विरोधी या दोनच लाटा होत्या, असा दावा देखील त्यांनी केला आहे. आता सर्वच पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने प्रत्येक पक्ष मोर्चेबांधणी करताना दिसत आहे. या सगळ्यात राजकीय कुरबुड्या बंद करून ज्यासाठी जनसामान्य मतदाराने राज्यकर्त्यांना सर्वोच्च स्थानी पोहोचवलं त्यांच्या प्रती असलेल्या दायित्वाची जाण राज्यकर्ते बाळगणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आणखी वाचा