(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Meteorological Day : आज साजरा होतोय जागतिक हवामानशास्त्र दिन; जाणून घ्या या दिनाचा इतिहास, महत्त्व
World Meteorological Day 2022: जगभरात आज जागतिक हवामानशास्त्र दिन साजरा केला जात आहे. जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व..
World Meteorological Day 2022: आज जगभरात जागतिक हवामानशास्त्र दिन साजरा केला जात आहे. 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामानशास्त्र संस्था ( World Meteorological Organization-WMO)स्थापन झाली होती. त्यामुळे 23 मार्च हा जागतिक हवामानशास्त्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मागील काही वर्षांपासून हवामान बदलामुळे मानव जातीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक हवामानशास्त्र दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. दरवर्षी जागतिक हवामानशास्त्र दिवसाची एक थीम निश्चित केली जाते. यंदाच्या वर्षी 'Early Warning and Early Action' ही थीम ठेवण्यात आली आहे.
जागतिक हवामानशास्त्र दिनाचा इतिहास
जागतिक हवामान दिवस दरवर्षी 23 मार्च 1950 रोजी स्थापन झालेल्या WMO च्या स्थापना दिनाच्या दिवशी साजरा केला जातो. स्वित्झर्लंड येथील जिनेव्हामध्ये याचे मुख्यालय आहे. WMO ही संस्था सन 1951 मध्ये संयुक्त राष्ट्राची (UN) विशेष संस्था बनली. पहिला जागतिक हवामान दिवस 23 मार्च 1961 रोजी साजरा करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सध्या 193 देश सदस्य राष्ट्रे आहेत. WMO ची स्थापना झाली तेव्हा 31 देश सदस्य होते. यामध्ये भारताचाही समावेश होता.
जागतिक हवामानशास्त्र दिनाचे महत्त्व
पर्यावरणीय स्थितीबद्दल जागरूकता वाढवण्याच्या अनुषंगाने या दिवसाचे महत्त्व आहे. योग्य वेळी खबरदारी आणि पावले उचलल्यास पृथ्वीवरील अनेक जीव वाचू शकतात. हवामान बदलामुळे जगातील अनेक भागांमध्ये चिंताजनक पर्यावरणीय बदल घडत आहेत. वाढत्या शहरीकरणात पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे जागतिक हवामानशास्त्र संस्थेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.
जागतिक हवामानशास्त्र दिनाची थीम
जागतिक हवामानशास्त्र दिन साजरा करताना दरवर्षी थीम निश्चित केली जाते. यंदाच्या वर्षी 'Early Warning and Early Action'ही थीम निश्चित करण्यात आली आहे. कोरोना महासाथीचे आव्हान लक्षात घेऊन ही थीम निश्चित करण्यात आली. मानवासमोरील आव्हाने गुंतागुंतीची झाली असून त्याचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणाही कमकुवत ठरली होती. त्यामुळे संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी आधीच तयारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी 'Early Warning and Early Action' ही थीम ठरवण्यात आली.