(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारी जागतिक आरोग्य संघटना
जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा वापरला जात आहे. भारताचा अविभाज्य भाग असलेले जम्मु काश्मीर आणि लडाख हे प्रदेश वेगळे दाखवले आहे.
मुंबई : गेले काही महिने कोरोनाकाळात जागतिक आरोग्य संघटना (WHO) चर्चेत आणि वादात आहे. अर्थात त्याची वेगवेगळी कारणं आहेत. भारताबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं वेळोवेळी घेतलेली भूमिका सामान्य भारतीयाच्या मनात संशय निर्माण होईल अशीच आहे. जगभरातील आरोग्याची काळजी वाहण्याची जबाबदारी असणाऱ्या या संघटनेच्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा वापरला जातोय.
कोरोनाचे अपडेट देणाऱ्या वेबसाईटवर भारताच्या नकाशात जम्मु काश्मीर आणि लडाख आहे. खरंतर आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या नकाशातून पाकिस्तानने हडपलेले पाकव्याप्त काश्मीर किंवा चीनने गिळंकृत केलेले अक्साई चीन हे भाग गायब असायचे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं त्यावर कडी करत भारताचा अविभाज्य भाग असलेले जम्मु काश्मीर आणि लडाख हे प्रदेश वेगळे दाखवून घोडचूक केली आहे. अशी चूक किंवा खोडी संघटनेकडून अपेक्षित नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं ही चूक लवकरात लवकर मागे घ्यावी अशी सर्वसामान्यांची भावना आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO वर अनेक आरोप केले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं कोणतेही ठोस उपाय केले नाहीत, चीनला पाठीशी घातलं असे आरोप जागतिक आरोग्य संघटनेवर केला जात आहे. यामुळे अमेरिकेने हजारो कोटी रुपयांचा आर्थिक निधी देणं बंद केलं.
हायड्रॉक्झीक्लोरोक्वीन या औषधाची मागणी वाढली तेव्हा भारताने अमेरिकेसह 40 ते 50 देशांना हे औषध पुरवलं. जागतिक आरोग्य संघटनेनं अचानक हायड्रॉक्झीक्लोकोरोक्वीनच्या क्लिनिकल चाचणीवर बंदी घातली. भारतातून हे औषध 70 टक्के निर्यात होतं.अर्थात WHO ला काही दिवसांनंतर ही बंदी मागे घ्यावी लागली. आता भारताचा चुकीचा नकाशा वापरुन जागतिक आरोग्य संघटना आणखी एक चुकीचा संदेश देत आहे.
संबंधित बातम्या :