WHO च्या 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' यादीत Covid-19 च्या नव्या सब-व्हेरियंटचा समावेश; JN.1 किती धोकादायक?
World Corona Update: जगभरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून चिंता वाढवली आहे. अशातच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक निवेदन जारी करत कोरोनाच्या नव्या सब-व्हेरियंट JN.1 चं 'व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकरण केलं आहे.
Coronavirus Updates: कोरोना व्हायरसनं (Coronavirus Updates) पुन्हा एकदा जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाचा नवा सब-व्हेरियंट (New Sub-Variant of Corona) सध्या जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) म्हणजेच, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नं याबाबत एक निवेदन जारी केलं आहे आणि कोरोनाचा नवा सब-व्हेरियंट JN.1 हे 'व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकरण केलं आहे. JN.1 पूर्वी त्याच्या मूळ वंशाच्या, BA.2.86 चा भाग म्हणून वर्गीकृत करण्यात आला होता. मात्र आता हिवाळा सुरू झाल्यानं हा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे, त्याचं स्वतंत्रपणे वर्गीकरण करण्यात आलं आहे.
डब्ल्यूएचओनं असंही म्हटलं आहे की, यामुळे लोकांना फारसा धोका नाही. WHO नं सांगितलं आहे की, "आतापर्यंत आढळून आलेले रुग्ण आणि परिस्थिती पाहता, JN.1 आरोग्यासाठी धोकादायक नाही. सध्याची लस या व्हेरियंटवर प्रभावी आहे आणि रुग्णांना त्यातून बरं होण्यासाठी फायदेशीर ठरते."
डब्ल्यूएचओ सातत्यानं जगभरातील परिस्थितीचा आढावा घेत आहे. WHO नं देखील लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात म्हटलं आहे की, लोकांनी गर्दीच्या, बंद किंवा खराब हवेच्या ठिकाणी मास्क वापरावं. तसेच, शक्यतोवर इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावं.
यूएन एजन्सीनं म्हटलं आहे की, सध्या असलेल्या कोरोनावरच्या लसी JN.1 आणि कोविड-19 विषाणूच्या इतर प्रकारांमुळे होणारे गंभीर रोग आणि मृत्यूपासून संरक्षण करतात. WHO नं आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय संबंधित सेवांमध्ये गुंतलेल्या लोकांसाठी एडव्हाझरी जारी केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. कोविड पॉझिटिव्ह रूग्णांवर PPE किट घालून उपचार करा आणि व्हेंटिलेटर सुविधा सुरळीत चालू ठेवा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचे 11 नवे रुग्ण
मंगळवारी (19 डिसेंबर) महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे (Maharashtra Coronavirus Updates) 11 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आठ केवळ राजधानी मुंबईत आढळून आले. आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 27 फक्त मुंबईत (Mumbai Coronavirus) सापडले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण सक्रिय आहे. होम आयसोलेशनमध्ये 23 रुग्ण आहेत. एक रुग्ण रुग्णालयात अलगावमध्ये आहे, त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गुजरातमध्ये दोन रुग्ण
महत्त्वाची बाब म्हणजे, दक्षिण भारतात प्रवास करून परतलेल्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. गुजरातमधील गांधीनगर येथे राहणाऱ्या दोन कोरोना पॉझिटिव्ह महिलांना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. केरळमध्ये JN.1 ची लागण झालेले रुग्ण आढळल्यानंतर दक्षिण भारतातून परतणाऱ्या लोकांवर विशेष लक्ष ठेवलं जात आहे. त्यामुळे गुजरातमधील दोन महिलांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही महिलांमध्ये सर्दी आणि खोकल्याची लक्षणं आढळून आली. 57 आणि 59 वर्षांच्या कोरोना पॉझिटिव्ह महिलांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत.