(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sri Lanka Crisis : श्रीलंकेत उपासमारीची वेळ, या परिस्थितीत फक्त भारताचा मदतीचा हात
Sri Lanka Food Crisis : श्रीलंकेमध्ये अन्नापासून ते स्वयंपाकाचा गॅस, औषध आणि अगदी टॉयलेट पेपरसारख्या वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे.
World Food Programme : श्रीलंका इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सध्या श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र आहे. देशात इंधनासह खाद्यपदार्थांचाही तुटवडा (Food Crisis) निर्माण झाला आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंची मोठी कमतरता जाणवत आहे. श्रीलंकेमध्ये सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अन्नापासून ते स्वयंपाकाचा गॅस, औषध आणि अगदी टॉयलेट पेपरसारख्या वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे.
श्रीलंकेच्या संकटकाळात फक्त भारताने मदतीचा हात दिला आहे. परकीय चलनांचा पुरेसा साठा नसल्याने श्रीलंकेला वस्तूंची आयात-निर्यात करता येत नाहीय. अशात भारत श्रीलंकेच्या मदतीला धावला आहे. श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कंचना विजेसेकारा यांनी म्हटलं आहे की, 'श्रीलंकेच्या आपत्तीच्या काळात एकमेव भारत देश श्रीलंकेच्या मदत करत आहे.'
अन्नटंचाईमुळे लाखो लोकांवर उपासमारीची वेळ
जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) शुक्रवारी श्रीलंकेतील परिस्थितीवरील आपल्या अहवालात म्हटले आहे की, देशाच्या 6.3 दशलक्ष किंवा 28 टक्के लोकसंख्येला अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे. हे संकट अधिक गडद झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. यापैकी किमान 65,600 लोकांवर उपासमारी सारखी परिस्थिती आली आहे, असं अहवालात म्हटलं आहे. तात्काळ हस्तक्षेप न केल्यास ही संख्या झपाट्याने वाढू शकते असा इशारा WFP ने दिला आहे.
परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी 63 दशलक्ष डॉलरची गरज
WFPने म्हटलं आहे की, अन्नाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे लोकांना अन्नाची गरज भागवणं कठीण होत आहे. सुमारे 67 लाख लोकांना पुरेसा आहार घेता येत नाही. श्रीलंकेतील अन्नसंकट दूर करण्यासाठी तातडीने 63 दशलक्ष डॉलर मदतीची आवश्यकता आहे.