(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nancy Pelosi : चीन-अमेरिका युद्धाच्या उंबरठ्यावर? नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्याला लष्करी हल्ल्याने प्रत्युत्तर देण्यासाठी चीनच्या हालचाली
Nancy Pelosi Taiwan visit : नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याला चीनने गंभीरपणे घेतलं असून चिनी लष्कर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
बीजिंग: विरोध असतानाही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी तैवान दौऱ्यावर आल्याने चीनचा चांगलाच तिळपापड झाला असून अमेरिकेच्या या कृतीला जशास तसं उत्तर देण्याचं त्या देशानं ठरवलं आहे. तैवानमध्ये नॅन्सी पेलोसी यांनी पाऊल ठेवल्यास तैपेई विमानतळ बॉंबने उडवून देऊ अशी धमकी चीनने अमेरिकेला दिली होती. आता नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याला प्रत्युत्तर म्हणून चीनचे लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. चायनिज पीपल्स लिबरेशन आर्मी हाय अलर्टवर असून त्यांना कधीही हल्ल्याचा आदेश येण्याची शक्यता आहे.
'वन चायना वन पॉलिसी' अंतर्गत चीन हा तैवानला आपला भाग मानतो. त्यामुळे तैवानने कोणत्याही देशासोबत संबंध ठेवण्याला चीनचा विरोध आहे. अशातच चीनचा विरोध झुगारत आज अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्या. अमेरिकेच्या या कृत्यानंतर चीनचा तिळपापड झाला असून त्या देशाने आपल्या लष्कराला युद्धाच्या तयारीचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या या कृत्यामुळे चीन-अमेरिका संबंधाला गंभीर नुकसान पोहोचलं असल्याची प्रतिक्रिया चीनने दिली आहे. दरम्यान, चिनी लष्कराच्या 20 हून अधिक लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत प्रवेश केल्याची माहिती आहे.
आपला तैवान दौरा हा जिवंत लोकशाहीचं समर्थन असून अमेरिका नेहमीच तैवानच्या मागे खंबीर उभी असल्याचा विश्वास अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांनी दिला आहे. चीनच्या बॉंबस्फोटाच्या धमकीनंतरही नॅन्सी पेलोसी या तैवानमध्ये गेल्या असून उद्या त्या राष्ट्रपतींना भेटणार आहेत. नॅन्सी पेलोसींच्या या दौऱ्यामुळे चीन दावा करत असलेल्या एका लोकशाही देशामागे जगातली सर्वात जुनी लोकशाही उभी असल्याचा संदेश अमेरिकेने दिला.
नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे आशिया खंडावर युद्धाचे ढग जमा झाले असून कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. चीन आणि अमेरिकेमध्ये युद्ध झालं तर या युद्धात अनेक देश ओढले जातील. चीनला रशियाने पाठिंबा दिला असून त्यांच्या बाजूने इराण या युद्धात उतरण्याची शक्यता असून अमेरिकेच्या बाजूने ऑस्ट्रेलिया, जपान युद्धात उतरतील.