(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UK PM Race: ऋषी सुनक ब्रिटीश पीएम शर्यतीत अव्वल, चौथ्या फेरीतही 118 मतांनी आघाडीवर
UK PM Race: ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे अव्वल स्थानी आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मते मिळाली.
UK PM Race: ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मते मिळाली. यासह माजी मंत्री कॅमी बडेनोच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यांना 59 मते मिळाली. त्यामुळे केवळ तीन उमेदवार रिंगणात राहिले आहेत. व्यापार मंत्री पेनी मॉर्डाउंट यांना 92 आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांना 86 मते मिळाली. आता पुढील फेरीत सुनक, पेनी मॉर्डाउंट आणि लिझ ट्रस यांच्यात सामना होणार आहे.
बुधवारी होणाऱ्या पाचव्या फेरीच्या मतदानानंतर शेवटच्या दोन उमेदवारांची नावे कळणार आहेत. यानंतर टोरी पक्षाच्या सदस्यसंख्येच्या बाजूने लक्ष केंद्रित केले जाईल. या सदस्यांची संख्या सुमारे 160,000 असल्याचा अंदाज आहे. जे या दोन उमेदवारांपैकी एकाच्या बाजूने मतदान करतील. ऑगस्टच्या अखेरीस मतांची मोजणी केली जाईल आणि 5 सप्टेंबरपर्यंत विजेत्याची घोषणा केली जाईल. तत्पूर्वी सोमवारी झालेल्या तिसऱ्या फेरीच्या मतदानात माजी अर्थमंत्री सुनक यांना 115 मते मिळाली. त्याचवेळी दुसऱ्या फेरीत 101 तर पहिल्या फेरीत 88 मते मिळाली. सुनक सर्व टप्प्यांवर आघाडीवर राहिले आहे.
दरम्यान, मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी अलीकडेच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी सुनक हे एक आहेत. जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर 42 वर्षीय सुनक यांनी पंतप्रधानपदासाठी प्रचार सुरू केला. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी सुनक बसू नये, अशी बोरिस जॉन्सन यांची इच्छा असल्याची एक बातमी अलीकडेच समोर आली होती. ते इतर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्यास तयार आहेत, परंतु सुनक यांना पंतप्रधान म्हणून त्यांना पाहायचे नाही. या बातमीनुसार बोरिस म्हणाले आहेत की, ऋषी सुनक यांच्यामुळे त्यांची पंतप्रधानपदाची खुर्ची गेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुनक यासाठी तयारी करत होते, असा दावाही त्यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: