Parliament Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; महागाईविरोधात संसदेच्या प्रांगणात काँग्रेस करणार आंदोलन
Parliament Session: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर आता विरोधक संसदेच्या अधिवेशनात आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. आज काँग्रेसकडून महागाईविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
Parliament Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Parliament Monsoon Session) आजच्या दुसऱ्या दिवसापासून विरोधक आक्रमक भूमिका घेणार असल्याची शक्यता आहे. महागाईसह इतर मुद्यावर आज काँग्रेसकडून संसद भवन परिसरात महात्मा गांधी पुतळ्याजवळ (Congress Protest in Parliament) आंदोलन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं उपोषणं करण्यावर लोकसभा सचिवालयानं बंदी घातली होती.
सोमवारी, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान पार पडले होते. त्यामुळे संसदेत फारसे कामकाज झाले नाही. त्यामुळे आजपासून संसदेच्या अधिवेशनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेससह इतर विरोधी पक्ष केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. महागाई, रुपयाचे होणारे अवमूल्यन, बेरोजगारी या मुद्यांसह वनाधिकार कायद्यातील प्रस्तावित बदलांसह केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात विरोधक आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या ऐक्याला सुरुंग लागला असल्याचे चित्र होते. त्यानंतरही या अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक एकत्र येणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
संसदेच्या अधिवेशनाच्या कामकाजा दरम्यान भाषण करताना खासदारांना काही शब्दांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारची मनाई म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी याआधीच केला होता. या मुद्याचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
या शब्दांना बंदी?
जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद, भ्रष्ट, बाल बुद्धी, स्नूपगेट, शर्म, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड, अक्षम, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाए, पिट्ठू , कमीना, काला सत्र, दलाल, खून की खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, ढिंढोरा पीटना, बहरी सरकार, चिलम लेना, छोकरा, कोयला चोर, गोरू चोर, चरस पीते हैं, सांड, खालिस्तानी, विनाश पुरुष, तानाशाही, तानाशाह, अराजकतावादी, गद्दार, अपमान, गिरगिट, गूंस, घड़ियाली आंसू, असत्य, अहंकार, काला दिन, काला बाजारी, खरीद फरोख्त, दंगा, दलाल, दादागीरी, बेचारा, संवेदनहीन, सेक्सुअल हरेसमेंट हे हिंदी शब्द हटवण्यात आले असल्याचं समोर आलं होतं.
पावसाळी अधिवेशनात 24 विधेयकं मांडली जाणार
या पावसाळी अधिवेशनात एकूण 24 विधेयके मांडली जाणार आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारनं रविवारी 17 जुलै रोजी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी सुमारे 25 मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदी गैरहजर होते या मुद्द्यावरुन काँग्रेसनं भाजपवर जोरदार टीका केली.