Boris Johnson: ब्रिटनचे PM बोरिस म्हणतात, मी पुन्हा येईन! 2030 पर्यंत पंतप्रधानपदी राहण्याची इच्छा
Boris Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 2030 पर्यंत ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठीची तयारी दर्शवली आहे.
Boris Johnson : ब्रिटनमधील सत्ता संघर्ष तीव्र सुरू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपणच 2030 पर्यंत सत्तेवर राहणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात पक्षातंर्गत अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. तरीदेखील जॉन्सन यांनी 2030 पर्यंत पंतप्रधानपदी राहणार असल्याचे म्हटले आहे. बोरिस जॉन्सन यांनी हा कार्यकाळ पूर्ण केल्यास ते मागील 200 वर्षात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे ते पहिलेच पंतप्रधान असणार आहेत. सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा मार्गारेट थॅचर यांचाही विक्रम जॉन्सन मोडीत काढू शकतात.
रंवाडा येथील राष्ट्रकुल प्रमुखांची बैठक झाल्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपण पुढील निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे म्हटले. ब्रिटनमधील आगामी निवडणुकीत हुजूर पक्षाचा विजय होईल असेही त्यांनी म्हटले. आपण तिसऱ्या टर्मसाठी निवडणूक लढवण्याचा विचार करत आहोत. पुढील वाटचाल नेमकी काय असावी, याबाबत गंभीरपणे विचार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतील कल पाहता आताच सार्वत्रिक निवडणूक झाल्यास मजूर पक्षाचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी हुजूर पक्षाच्या अनेक खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना निवडणुकीतील पराभवाबाबत इशारा दिला आहे. तर, कॅबिनेट मंत्री ब्रॅडन लेव्हिस यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे तिसऱ्या टर्मबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात पक्षातंर्गतही नाराजी आहे. हुजूर पक्षाच्या नियमांनुसार, बोरिस जॉन्सन यांच्या विरोधात पक्षातंर्गत अविश्वास ठराव मांडण्यात आला. या ठरावाच्या बाजूने जवळपास 41 टक्के जणांनी मतदान केले. त्यामुळे आता जॉन्सन यांच्याविरोधात पक्षातंर्गतही नाराजी वाढत असल्याचे म्हटले जात आहे.
ब्रिटनमध्ये महागाईने मागील 40 वर्षातील उच्चांक गाठला आहे. बेरोजगारी वाढल्याने नाराजी वाढली आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठं आर्थिक संकट उभे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत हुजूर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता.