बराक ओबामा, बिल गेट्स, वॉरेन बफेट यांच्यासह 20 दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स हॅक
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह जगभरातील अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स हॅक्स करण्यात आले आहेत. हॅक केलेल्या 20 जणांच्या अकाऊंटवरुन एकसारखंच ट्वीट केलं होतं.
मुंबई : हॅकर्सने ट्विटरवर मोठा हल्ला केला आहे. जगभरातील अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स हॅक्स करण्यात आले आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय उद्योजक अॅलन मस्क, जेफ बेजोस आणि बिल गेट्स यांच्यासह जगभरातील अनेक मोठ्या उद्योजकांचेही ट्विटर अकाऊंट्स हॅक करण्यात आले आहेत.
हॅक केलेल्या प्रत्येक अकाऊंटवरुन एकसारखं ट्वीट केलं होतं. बिटकॉईनद्वारे पैसे पाठवा आणि तुम्हा दुप्पट पैसे देऊ. आता वेळ आलीय की आम्ही समाजातून जे कमावलं ते परत करण्याची, असंही या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. विशेष म्हणजे हॅकिंगचा प्रकार लक्षात येईपर्यंत शेकडो लोकांनी एक लाखांमध्ये जास्त डॉलर पाठवले होते. पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांतच हे ट्वीट डिलीटही झाले.
या सगळ्या प्रकारावर ट्विटरने म्हटलं आहे की हा काळ आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. हे सगळं पूर्ववत करण्यासाठी आमची टीम अथक मेहनत करत आहे.
या दिग्गजांचे अकाऊंट्स हॅक
- अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा
- डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन
- इस्रायलेचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
- टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क
- अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस
- अमेरिकेचा प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट
- अमेरिकेची टीव्ही स्टार किम कार्दाशियन
- मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स
- बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफेट
- माईक ब्लूमबर्ग
- अमेरिकेचे प्रसिद्ध रॅपर विज खलिफा
- यूट्यूबर मिस्टर बीस्ट
- याशिवाय उबर आणि अॅपल कंपनीचे कॉर्पोरेट अकाऊंट्सही हॅक झाले आहेत
ट्विटरने काय म्हटलं? ट्विटरचे सीईओ जॅक या संपूर्ण प्रकरणावर म्हणाले आजचा दिवस ट्विटरसाठ अतिशय कठीण होता, आम्ही हॅकिंग रोखण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय अनेक अकाऊंट्स बंदही केले होते, जे आता पुन्हा सुरु केले आहेत. ही हॅकिंग कशी झाली आणि यामागे कोण होतं याचा तपास सुरु आहे.
We have locked accounts that were compromised and will restore access to the original account owner only when we are certain we can do so securely.
— Twitter Support (@TwitterSupport) July 16, 2020