(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Turkey-Syria Earthquake: तुर्कीमध्ये मृतांची संख्या 19 हजारांवर, जपानमधील 'फुकूशिमाला'ही मागे टाकलं
जपानमध्ये फुकूशिमा या अणुउर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी भूकंप होऊन जवळपास 18,500 लोकांचा मृत्यू झाला होता.
Turkey-Syria Earthquake LIVE updates: तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामध्ये मृतांची संख्या ही 19,300 हून अधिक झाली आहे. हा भूकंप गेल्या काही दशकातील सर्वात मोठा असून या आधी झालेल्या जपानमधील फुकूशिमा आपत्तीमध्ये झालेल्या मृतांच्या संख्येपेक्षा ही संख्या जास्त असल्याचं असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थएनं म्हटलं आहे.
1986 मध्ये चेर्नोबिल दुर्घटनेनंतर जपानमधील फुकुशिमा मेल्टडाउन ही जगातील सर्वात वाईट अणुदुर्घटना होती. भूकंप आणि त्सुनामीमध्ये सुमारे 18,500 लोक मरण पावले. या दुर्घटनेत तब्बल 1,60,000 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलं होतं. त्यानंतर 2015 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या 7.8 रिश्टरच्या भूकंपात 8,800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तुर्कीतील भूकंप हा या दोन्ही भूकंपाहून भयंकर ठरला असून मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
तुर्कीमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. अशा परिस्थितीत बचाव कार्यात मोठी अडचण येत आहे. एवढंच नाही तर खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं लँडिंग करणंही अशक्य होत आहे. अशा परिस्थितीत सर्व मदत रस्त्याच्या मार्गाने बाधित भागांत पोहोचत आहे. तुर्की-सीरिया कॉरिडॉरही भूकंपामुळे उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत रस्त्यानं सीरियापर्यंत मदत पोहोचवताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.
तुर्कीमध्ये सोमवारी पहाटे 04 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू गझियानटेपजवळ होता. हे शहर सीरिया सीमेपासून 90 किमी अंतरावर आहे. त्यानंतर सीरियातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्केही जाणवले. तुर्कीमधील हा 100 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचं सांगण्यात येत आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपानंतर तुर्कीत 77 आफ्टरशॉक बसलेत. यापैकी एक भूकंप 7.5 रिश्टर स्केलचा होता. तर तीन धक्के 6.0 रिश्टर स्केलपेक्षा जास्त होते.