Texas School Shooting : टेक्सासमधील शाळेवरील गोळीबार म्हणजे, नरसंहार; जो बायडन यांच्याकडून शोक व्यक्त
Texas School Shooting : अमेरिकेतील टेक्सास शहरातील शाळेला एका माथेफिरुन लक्ष्य केलं होतं. 18 वर्षांच्या तरुणानं केलेल्या गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
Texas School Shooting : अमेरिका पुन्हा एकदा एका माथेफिरुनं केलेल्या गोळीबारानं हादरली आहे. अमेरिकेतील टेक्सास (Texas) शहरात एका 18 वर्षांच्या तरुणानं एका शाळेत घुसून गोळीबार केला. या गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत गोळीबार करणारा माथेफिरून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देशाला संबोधित केलं. त्यावेळी ही घटना म्हणजे, हत्याकांड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) बोलताना म्हणाले की, राष्ट्रपती झाल्यानंतर असं भाषण करावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. या घटनेत ज्यांच्या मुलांचा मृत्यू झालाय, त्या सर्व कुटुंबांप्रती त्यांनी शोक व्यक्त केला. याशिवाय गेल्या काही वर्षांत अमेरिकन शाळांवर झालेल्या हल्ल्यांचाही बायडेन यांनी उल्लेख केला.
आपण हे सहज विसरु शकत नाही : बायडन
बायडन म्हणाले की, "मी या घटना पाहून थकलोय. मी सर्व पालक आणि जनतेला आवाहन करतो की, ही वेळ काहीतरी करण्याची आहे. आपण हे सहज विसरु शकत नाही. आपल्याला यासंदर्भात ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. तसेच, या वेदना कृत्यात बदलण्याची वेळ आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "बंदुकांचा बाजार खूप वेगानं वाढत आहे. एक राष्ट्र म्हणून आपण विचारलं पाहिजे की, आपण गन लॉबीच्या विरोधात कधी उभे राहणार आणि आपल्याला काय करण्याची गरज आहे? आम्हाला काय करण्याची गरज आहे? दुर्दैवं हे आहे की, ते पालक आता त्यांच्या मुलांना पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीत."
जो बायडन म्हणाले की, "हे सर्व निष्पाप चिमुकल्यांसोबत घडलं आहे. ही मुलं तिसरी आणि चौथीच्या वर्गात होती. यातील अनेक मुलांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींना प्राण गमावताना पाहिलं आहे. दुर्दैवं म्हणजे, असे बरेच पालक आहेत, जे आपल्या मुलांना पुन्हा कधीही पाहू शकणार नाहीत. मूल गमावणं म्हणजे तुमच्या शरीराचा एक भाग काढून टाकण्यासारखं आहे."
शूटआऊट @Texas, शाळेत हल्लेखोर युवकाकडून अंदाधूंद गोळीबार
गोळीबारामुळे अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. टेक्सासच्या एका शाळेत झालेल्या गोळीबारात 18 मुलांसह एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील एका प्राथमिक शाळेत एका बंदुकधारी युवकानं गोळीबार केला. ज्यामध्ये शाळेतील 18 मुलांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमीही झाले आहेत. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल हल्लेखोर ठार झाला.