Sri Lanka : श्रीलंकेत पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे संकट गंभीर, पेट्रोल पंपावरील हाणामारीनंतर लष्करी बंदोबस्त तैनात
Sri Lanka : श्रीलंकेत सध्या पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे संकट घोंघावत आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी इंधन मिळविण्यासाठी जोरदार हाणामारीही झाली आहे.
Sri Lanka : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आता इथे पेट्रोल, डिझेल, गॅस आणि इतर जीवनावश्यक तेलाचे (रॉकेल) संकटही सुरू झाले आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर मंगळवारी पेट्रोल पंपावर लष्कर तैनात करण्यात आले होते. पंपांवर इंधनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. श्रीलंका सात दशकातील सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. येथे विजेबरोबरच खाण्यापिण्याच्या पदार्थांसांचीही समस्या सतावत आहे.
रस्त्यावर नागरिकांचा गोंधळ
श्रीलंका सरकारचे प्रवक्ते रमेश पाथिराना यांनी सांगितले की, इंधन मिळवण्यासाठी संतप्त जमावाने कोलंबोमधील मुख्य रस्ता अडवून तासनतास वाहतूक रोखून धरली होती. यानंतर येथे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. हा जमाव रॉकेल घेण्यासाठी पोहोचला होता, मात्र ते मिळू शकले नाही, असे त्यांनी सांगितले.
पर्यटकांचा डबा महिलांनी थांबवला
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये रॉकेलच्या कमतरतेच्या निषेधार्थ संतप्त महिलांचा जमाव पर्यटकांचा ताफा रोखताना दिसत आहे. अशाप्रकारे पर्यटकांना अडवल्याच्या आणखीही अनेक तक्रारी समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय काही लोक तेलाचा साठा करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने पंप आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलासाठीही हत्या
मिळालेल्या अहवालानुसार, अलीकडेच कोलंबोबाहेर इंधनासाठी लांबलचक रांगेत उभ्या असलेल्या जागेवरून झालेल्या वादानंतर एका दुचाकीस्वाराला दुसऱ्या चालकाने चाकू भोसकून ठार मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपासून इंधनाच्या रांगेत तीन वृद्धांचा मृत्यू झाला आहे. रांगा लांबत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : युद्धात 15,300 रशियन सैनिक मारले गेल्याचा युक्रेनचा दावा, 99 विमानांसह 509 रशियन टँकही नष्ट
- Russia Ukraine War : लाखो डॉलर्स घेऊन पळून जात होती युक्रेनच्या माजी खासदाराची पत्नी, सुटकेससह हंगेरियन सीमेवर सैनिकांनी पकडले
- Russia Ukraine War : युद्धात 15,300 रशियन सैनिक मारले गेल्याचा युक्रेनचा दावा, 99 विमानांसह 509 रशियन टँकही नष्ट