युरोपमधील गांजाची सर्वात मोठी शेती उद्ध्वस्त; 166 एकरावरील गांजा नष्ट
Cannabis Plantation : स्पेन अधिकाऱ्यांनी 166 एकरावर असलेली गांजाची शेती नष्ट केली. युरोपमधील ही सर्वात मोठी शेती होती.
Cannabis Plantation : स्पॅनिश अधिकाऱ्यांनी बुधवारी युरोपमधील सर्वात मोठी गांजाची लागवड नष्ट केली. स्पेनच्या उत्तर भागातील नॅव्हारे प्रांतातील ग्रामीण भागात ही शेती केली जात होती. जवळपास 166 एकर जमिनीवर ही शेती केली जात होती.
स्पॅनिश पोलिसांनी या मोहिमेत 100 दशलक्ष युरो किमतीची गांजाची शेती नष्ट केली असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. त्याशिवाय, कॅनाबिडिओलसाठी (CBD)सुमारे 50 टन गांजा एका गोदामात वाळवला जात होती. कॅनाबिडिओलचा वापर हा चिंता, निद्रानाश आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. सीबीडी विक्री आणि वापर देशभरात आणि युरोपच्या अनेक भागांमध्ये कायदेशीर आहे. मात्र, स्पेनमध्ये औद्योगिक कारणाशिवाय गांजाची लागवड करण्यास मनाई आहे. मात्र, तरीदेखील बेकायदेशीरपणे गांजाची शेती केली जाते.
बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याप्रकरणी स्पेन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या गाजांच्या शेतीची लागवड 2021 च्या मध्यापासून सुरू झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गार्डिया सिव्हिल फोर्सच्या म्हणण्यानुसार, शेताच्या मालकाने औद्योगिक हेतूंसाठी गांजाची लागवड करण्याची परवानगी घेतली होती. मात्र, इटली व स्वित्झर्लंडला बेकायदेशीरपणे निर्यात करण्यासाठी गांजाची लागवड करण्यात आली. या गांजाचा वापर सीबीडीसाठी करण्यात येत होता.
एका अहवालानुसार, स्पॅनिश पोलीस दरवर्षी दहा लाखांहून अधिक गांजाची शेती नष्ट करतात. यातील बहुतांशी शेती स्पेनच्या कॅटालोनिया प्रदेशात केली जाते. मागील वर्षी गार्डिया सिव्हिल फोर्स आणि फ्रेंच नॅशनल पोलिसांनी युरोपोलच्या मदतीने संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणारे, मनी लाँड्रिंग करणाऱ्या टोळ्या गजाआड करण्यात आल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Infosys : भारताची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने रशियातील आपला व्यवसाय गुंडाळला! जाणून घ्या कंपनीने का घेतला हा निर्णय?
- Nepal : नेपाळसह संपूर्ण दक्षिण आशियात डॉ.बाबासाहेबांचा प्रभाव; नेपाळच्या राष्ट्रपतींकडून स्मरण