(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Somalia Bomb Blast : सोमालियातील हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट आणि गोळीबार, नऊ जण ठार, 47 जखमी
Somalia Bomb Blast : अल-कायदाशी संबंधित अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
Somalia Bomb Blast : सोमालियातील किसमायो भागातील एका हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्ब एका कारमध्ये ठेवण्यात आला होता, तसेच या दरम्यान गोळीबारही झाला, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला, तर 47 जण जखमी झाले. यावेळी सुरक्षा दलांनी घेराव घालून दहशतवादी हल्लेखोरांना ठार केले. अल-कायदाशी संबंधित अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले की, दक्षिण सोमालीया येथील जुबालँडच्या सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना वेढा घालत ठार केले आहे.
आतापर्यंत 9 जण मृत्युमुखी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात हल्लेखोर ठार झाले असून यामध्ये अडकलेल्या अनेकांची सुटका करण्यात आली आहे. मात्र जखमींबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. परंतु किसमायो रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या घटनेत आतापर्यंत 9 जण मृत्युमुखी पडले आहेत, त्यापैकी चार सुरक्षा कर्मचारी आहेत. या हल्ल्यात 47 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कारमध्ये बॉम्बचा स्फोट घडवून हॉटेलमध्ये घुसले दहशतवादी
एका रिपोर्टनुसार, किसमायो येथील हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आठ जखमी झाले असून दहशतवाद्यांनी एका कारमध्ये बॉम्बचा स्फोट घडवून ते हॉटेलमध्ये घुसले. विशेष म्हणजे, अल-शबाब या कट्टरपंथी इस्लामी गटाने या हल्ल्याची आणि स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. अल-शबाबचा थेट अल-कायदाशी संबंध आहे. ही दहशतवादी संघटना सोमालिया सरकारच्या विरोधात लढत आहे आणि अजूनही देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात मोठ्या भागावर त्यांचे नियंत्रण आहे.
यापूर्वी हयात हॉटेलवर हल्ला
यापूर्वी, सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी हयात हॉटेलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अल शबाबने यापूर्वी मोगादिशू शहरात अनेक भयानक स्फोट घडवून आणले आहेत. अल-शबाब या दहशतवादी संघटनेची स्थापना 2006 मध्ये झाली होती. अल-शबाब हा दहशतवादी गट अल-कायदाशी संबंधित आहे, जो सोमालिया सरकारच्या विरोधात सशस्त्र संघर्ष करत आहे. 14 ऑगस्ट रोजी सोमालियामध्ये अलीकडेच अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात अल-शबाबचे 13 अतिरेकी मारले गेले.
भारताकडून हल्ल्याचा निषेध
मोगादिशू येथील हयात हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला. त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदनाही व्यक्त केल्या आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत सोमालिया सरकार आणि लोकांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही दिली.