Shehbaz Sharif : पाकच्या पंतप्रधानांकडून PM नरेंद्र मोदींची कॉपी; सियालकोटच्या लष्करी तळाला भेट, रणगाड्यावर उभं राहून ठोकलं भाषण
Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकतीच सियालकोटच्या पसरूर परिसरातील लष्करी तळाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रणगाड्यावर उभं राहत सैन्याशी संवाद साधला.

Shehbaz Sharif : पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने (India) अत्यंत कठोर आणि ठाम पवित्रा घेतला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तान (Pakistan) तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांचा यशस्वीपणे नायनाट केला. तथापि, या कारवाईनंतरही पाकिस्तानने आपली दहशतवादी कारवायांची मालिका थांबवली नाही. उलट, भारतातील नागरी भागांना लक्ष्य करत पुन्हा हल्ले चढवले. मात्र, भारताने प्रत्येक वेळी अधिक आक्रमक आणि निर्णायक पवित्रा घेत पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले आणि माघारी हटवले. भारताच्या या निर्णायक कारवायांमुळे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी झाली होती. परिणामी, दोन्ही देशांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आणि परिस्थिती युद्धजन्य अवस्थेपर्यंत पोहोचली होती. या तीव्र संघर्षाच्या तीन दिवसांनंतर, अखेर शनिवारी (दि. 10) भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामावर सहमती झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. यानंतर मंगळवारी (दि. 13) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंजाबमधील आदमपूरच्या एअरबेसला भेट दिली. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या शूर जवानांचे त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी पंतप्रधान मोदींची कॉपी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानी लष्करी तळाला भेट
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकतीच सियालकोटच्या पसरूर परिसरातील लष्करी तळाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रणगाड्यावर उभं राहत सैन्याशी संवाद साधला. ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीची त्यांनी नक्कल केल्याची चर्चा सुरु झाली आहे. पसरूर कँटोन्मेंट लाहोरपासून १३० किलोमीटरवर आहे. ऑपरेशन सिंदूरविरोधात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या कारवाईत सहभागी झालेले सैनिक आणि अधिकारी यांच्याशी शरीफ यांनी संवाद साधला आहे. तर येत्या काही दिवसांत ते हवाई दलाचे तळ आणि नौदल तळालाही भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शहबाज शरीफांची भारताला पुन्हा पोकळ धमकी
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सिंधू जल करार संदर्भात भारताला पोकळ धमकी दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, "आम्ही युद्धासाठीही आणि शांततेसाठीही तयार आहोत, निर्णय भारताने घ्यायचा आहे." शरीफ पुढे म्हणाले, "जर तुम्ही आमचं पाणी रोखाल, तर ती आमच्यासाठी एक रेड लाईन ठरेल. पाणी हे आमचं हक्काचं आहे. आमचं लष्कर आणि आमची जनता पाकिस्तानच्या हक्कांसाठी लढेल," असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा























