Serbia Parliament : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
1 नोव्हेंबर रोजी सर्बियाचे दुसरे सर्वात मोठे शहर नोवी सॅड येथील रेल्वे स्टेशनच्या छताचा काही भाग कोसळला होता. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली.

Serbia Parliament : युरोपीय देश सर्बियाच्या संसदेत मंगळवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी स्मोक ग्रेनेड फेकले. सरकारी धोरणांच्या निषेधार्थ आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विरोधी खासदारांनी थेट संसदेत स्मोक ग्रेनेड फेकल्याने अवघा युरोप हादरला आहे. सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीने अधिवेशनाचा अजेंडा मंजूर करताच काही विरोधी नेते आपल्या खुर्च्यांवरून उठले आणि सभापतींच्या खुर्चीकडे धावले. त्यांनी सभागृहात स्मोक ग्रेनेड फेकले, ज्यामुळे सभागृह काळ्या धुराने भरुन गेले. यावेळी त्यांची सुरक्षा रक्षकांशी सुद्धा धक्काबुक्की झाली. या हल्ल्यात दोन खासदार जखमी झाले असून त्यापैकी एका खासदाराची प्रकृती चिंताजनक आहे. सभापती अना ब्रनाबिक यांनी सांगितले की संसदेचे काम सुरूच राहील.
पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार होती
देशातील विद्यापीठांसाठी निधी वाढवण्यासाठी सर्बियन संसद मंगळवारी कायदा करणार होती. यासोबतच पंतप्रधान मिलोस वुसेविक यांच्या राजीनाम्यावरही चर्चा होणार होती, मात्र सत्ताधारी आघाडीने मांडलेल्या अजेंड्यावरील इतर मुद्द्यांवर विरोधक नाराज होते. यानंतर गदारोळ झाला.
Opposition lawmakers let off smoke grenades in Serbia's parliament to protest against government policies https://t.co/MnR9Yrzsu2 pic.twitter.com/Nnh0n28v18
— Reuters (@Reuters) March 4, 2025
15 जणांच्या मृत्यूनंतर निदर्शने सुरू झाली
खरं तर, 1 नोव्हेंबर रोजी सर्बियाचे दुसरे सर्वात मोठे शहर नोवी सॅड येथील रेल्वे स्टेशनच्या छताचा काही भाग कोसळला होता. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि या घटनेची जबाबदारी घेण्याची मागणी करू लागले. बांधकाम प्रकल्पातील भ्रष्टाचारामुळे बाल्कनी कोसळण्याची घटना घडल्याचा आरोप लोकांनी केला.
आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांकडून दररोज 15 मिनिटे महामार्गावर आंदोलन
या आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ते देशभरात दररोज रात्री 11.52 वाजता 15 मिनिटे वाहनांची वाहतूक रोखत असत. याच वेळी रेल्वे स्थानकावर बाल्कनी पडून अपघात झाला होता. याशिवाय देशातील विद्यापीठांमधील शिक्षणही ठप्प झाले होते. त्यांचा राग शांत करण्यासाठी पंतप्रधानांनी राजीनामा दिला होता. गेल्यावर्षी 24 नोव्हेंबर रोजी निदर्शने आणखी तीव्र झाली. लोकांनी कामावर जाणे बंद केले. लोकांचा वाढता संताप पाहून पंतप्रधान वुसेविक म्हणाले होते की, देशातील तणाव आणखी वाढू नये अशी त्यांची इच्छा आहे, त्यामुळे परिस्थिती शांत करण्यासाठी ते आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. वुसेविक मे 2024 पासून पंतप्रधानपदावर होते. याआधी त्यांनी उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री ही पदे भूषवली होती.
इतर महत्वाच्या बातम्या























