SCO Summit 2022 : तीन वर्षांनंतर भारत-पाकिस्तानचे PM एकाच व्यासपीठावर, SCO शिखर परिषदेत काय असेल खास?
SCO Summit 2022 : या शिखर परिषदेत पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ आमनेसामने असतील.
SCO Summit 2022 : SCO म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटचे आयोजन समरकंद, उझबेकिस्तान येथे होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) देखील सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेत पहिल्यांदाच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan PM) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमनेसामने असतील. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पीएम मोदी आज दुपारी समरकंदला रवाना होतील आणि आज संध्याकाळी 6 वाजता पोहोचतील. उद्या म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी PM मोदी SCO च्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (Vladimir Putin) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (China Xi Jinping) यांचीही भेट घेतील तेव्हा सर्वांच्या नजरा भारतावर असतील.यावेळची SCO समिट अनेक अर्थाने खास आहे.
2019 मध्ये इम्रान खान-पीएम मोदी भेट
याआधी 2019 मध्ये, किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्यात बैठक झाली होती, ज्याला सौजन्य भेट असे नाव देण्यात आले होते. मात्र, या परिषदेत पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे भारताच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
भारत-पाक पंतप्रधानांची तीन वर्षांनी भेट
तीन वर्षांनंतर म्हणजेच 2022 मध्ये दोन्ही देशांचे पंतप्रधान पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. मात्र, यावेळीही चर्चा होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली तर भारत-पाकिस्तान व्यापारासाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरेल. पाकिस्तानला कोणत्याही किंमतीत भारताशी चर्चा करायला आवडेल, कारण तिथे पुरामुळे कहर झाला आहे आणि आधीच कोलमडलेली अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.
एलएसीवरील तणावादरम्यान जिनपिंग भेटणार
पीएम मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तब्बल 34 महिन्यांनंतर भेटणार आहेत. भारत-चीन सीमा वादाच्या संदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दोघांमधील शेवटची भेट 2019 मध्ये ब्रिक्स परिषदेदरम्यान झाली होती. सीमावादानंतर दोघांची ही पहिलीच भेट असेल. भारत आणि चीनच्या सैन्यानेही वादग्रस्त भागातून त्यांचे बंकर हटवले आहेत.
युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान पुतिन प्रथमच आंतरराष्ट्रीय मंचावर
युक्रेनसोबतच्या युद्धानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन प्रथमच आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित राहणार आहेत. युक्रेनवरील हल्ल्यामुळे जगातील अनेक मोठे देश रशियाच्या विरोधात आहेत, परंतु भारताने या प्रकरणी तटस्थता दाखवली आहे आणि चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो असे नेहमीच सांगितले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या भेटीसोबतच पुतिन आणि शी जिनपिंग यांच्या भेटीकडेही संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.