Russia Bulava Missile: पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
Russia Bulava Missile: रशियन भाषेत या क्षेपणास्त्राला 'बुलावा' म्हणून संबोधलं जातंय. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या 40 फूट लांबीच्या क्षेपणास्त्राची रेंज सुमारे 8304 किमी आहे.
Russia Vladimir Putin Bulava Missile: नवी दिल्ली : रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 'द सेप्टर' नावाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे अनावरण केलंय. हे क्षेपणास्त्र अणुऊर्जेनं सुसज्ज असून पाण्याखाली लपलेल्या पाणबुड्यांवरुनही हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकतं. रशियाच्या लष्करानं (Russian Army) या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाचा व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर जगभरातील देश चिंतेत पडले आहेत. पुतिन यांनी क्षेपणास्त्र थेट प्रक्षेपण करुनच जगासमोर आणलं. याचं प्रक्षेपण थेट जगभरात प्रसारित करण्यात आलं. दरम्यान, रशियन भाषेत या क्षेपणास्त्राला 'बुलावा' म्हणून संबोधलं जातंय. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या 40 फूट लांबीच्या क्षेपणास्त्राची रेंज सुमारे 8304 किमी आहे.
द सनच्या वृत्तानुसार, रशियन लष्करानं जारी केलेल्या व्हिडीओमध्ये पाण्याखाली प्रचंड मोठा स्फोट होतो. स्फोटासोबतच 'RSM-56 Bulava' क्षेपणास्त्र पाण्यातून सोडलं आणि आकाशात धुराचे ढग पसरले. स्फोटानंतर काही सेकंदात क्षेपणास्त्र ढगांमध्ये नाहीसं होतं. रशियाकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र सरावाकडे पाश्चात्य आणि नाटो देशांना कडक इशारा म्हणून पाहिलं जात आहे.
The #Russian military has put into service the #Bulava submarine-launched intercontinental ballistic missile, which is a key element in the modernization of Russia's #nucleararsenal.
— Extrema Ratio (@ExtremaRatio4) May 14, 2024
The Bulava missile was developed under a program that began in the 1990s and is deployed on… pic.twitter.com/8bwCZXmCSV
'बुलावा' एकाच वेळी 10 लक्ष्य साधू शकतो
रशियाच्या ताफ्यात अनेक शक्तिशाली क्षेपणास्त्र आहेत. अशातच आता 'बुलावा'ची भर पडली आहे. 'RSM-56 Bulava' क्षेपणास्त्र पाणबुडीतून अगदी सहजपणे डागता येतं. या क्षेपणास्त्राची लांबी 40 फूट असून त्याचा पल्ला 8304 किमी आहे. RSM-56 Bulava 10 आण्विक मार्गदर्शित वॉरहेड्स वाहून नेण्यास सक्षम आहे आणि एकाच वेळी अनेक लक्ष्यांना व्यस्त ठेवण्यासाठी डिझाइन केलेलं आहे. RSM-56 Bulava चं वजन 37 टन आणि पेलोड 1150 kg आहे. हे रशियन क्षेपणास्त्र जमीन, हवा आणि पाण्यातून डागता येतं. संपूर्ण जगात बुलावाची धास्ती पसरली असून जग एक महत्त्वाचं आणि अत्यंत शक्तिशाली अण्वस्त्र म्हणून याकडे पाहत आहे.
रशियाचा पाश्चिमात्य देशांना इशारा
शक्तिशाली 'बुलावा' हे क्षेपणास्त्र मॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ थर्मल टेक्नॉलॉजीनं बनवलं आहे, ज्यावर 1990 च्या दशकात काम सुरू झालं होतं. काही काळापूर्वी पुतिन सागरी अण्वस्त्रांच्या चाचणीबाबत बोलले होते. त्यांनी थेट पाश्चिमात्य देशांना अणुयुद्धाचा इशारा दिला होता. पाश्चात्य देशांनी युक्रेनला पाठिंबा देत राहिल्यास रशियाला अण्वस्त्र हल्ला करण्यास भाग पाडलं जाईल, असं पुतीन म्हणाले होते. पुतिन यांच्या वक्तव्यानं संपूर्ण जगभरात खळबळ माजली होती. अशातच 'बुलावा'चं प्रक्षेपण म्हणजे, पुतिन यांनी अण्वस्त्र हल्ल्याची संपूर्ण तयारी केल्याचं बोललं जातंय. याचसंदर्भात अमेरिकेच्या एका माजी राजदूतानं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, "पाश्चात्य देशांचा सामना करण्यासाठी पुतीन अत्यंत गंभीर असून अण्वस्त्र हल्ल्याचा धोका नाकारता येत नाही."