Russia Ukraine Crisis : युक्रेनवरील हल्ल्यानंतर ब्रिटनने रशियावर लादले नवे निर्बंध, रशियन बँका लंडनच्या आर्थिक व्यवस्थेबाहेर
Russia Ukraine Crisis : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसदेत युक्रेनवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुढील निर्बंधांनुसार, रशियन बँकांना लंडनच्या आर्थिक व्यवस्थेतून बाहेर ठेवले जाईल.
Russia Ukraine Crisis : युक्रेन-रशियामधील युद्धाच्या परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर खळबळ माजली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी रशियावर नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केली. त्यांनी संसदेत युक्रेनवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुढील निर्बंधांनुसार, रशियन बँकांना लंडनच्या आर्थिक व्यवस्थेतून बाहेर ठेवले जाईल. ब्रिटनने यापूर्वी पाच रशियन बँका आणि पुतीन यांच्या तीन मित्र राष्ट्रांवर निर्बंध जाहीर केले होते.
रशियाचे अध्यक्ष पुतिन हे कधीही आपल्या हातांनी युक्रेनचे रक्त साफ करू शकणार नाहीत, असेही जॉन्सन म्हणाले. याआधी गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनवरील रशियन हल्ल्याला युरोप खंडासाठी आपत्ती असल्याचे म्हटले होते. डाउनिंग स्ट्रीटमधील आपत्कालीन कॅबिनेट ऑफिस ब्रीफिंग रूम ए (कोब्रा) च्या बैठकीनंतर जॉन्सन यांनी ट्विटरवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ही आपल्या खंडासाठी एक आपत्ती आहे."
जॉन्सन यांनी गुरुवारी पहाटे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी संपर्क साधला आणि पुतिन यांनी युक्रेनियन लोकांविरुद्ध मोहीम सुरू केल्यामुळे पाश्चात्य देश गप्प बसणार नाहीत अशी शपथ घेतली. फोनवरील संभाषणानंतर जॉन्सन यांनी काही वेळातच ट्विट केले की, "युक्रेनमधील भीषण घटनांमुळे मी हैराण झालो आहे आणि पुढच्या पावलांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी बोललो आहे. रशियाने विनाकारण हल्ला करून रक्तपात आणि विनाशाचा मार्ग निवडला आहे. ब्रिटन आणि आमचे मित्र देश निर्णायक उत्तर देतील."
युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा निषेध : बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. या युद्धातील नुकसान आणि मृत्यूला केवळ रशिया जबाबदार असेल असे त्यांनी म्हटले आहे. बायडेन म्हणाले की अध्यक्ष पुतिन यांनी पूर्व-नियोजन करून युद्ध निवडले आहे. अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र योग्य आणि निर्णायक पद्धतीने प्रत्युत्तर देतील, असे ते म्हणाले. ब्रिटन, युरोपियन युनियन, संयुक्त राष्ट्र आणि नाटोच्या नेत्यांनीही रशियाच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन वादावर केवळ संवादातून मार्ग निघेल; पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदींचे आवाहन
- Russia-Ukraine: थोडा जरी आत्मसन्मान शिल्लक असेल तर इम्रान खाननी रशिया दौरा रद्द करावा: शशी थरूर
- Russia-Ukraine Crisis: रशियाचं वर्तन हे 'नाझी जर्मनी'सारखं; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोदिमर झेलन्स्की यांचा आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha