(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine Crisis : युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेध प्रस्तावावर भारताचं मतदान नाही, मात्र हिंसेचा विरोध! चीनही तटस्थ
Russia-Ukraine War : युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियन सैन्याला माघारी बोलावण्याच्या प्रस्तावावर मध्यरात्री मतदान पार पडलं. यावेळी भारत आणि चीननं पुन्हा एकदा तटस्थ भूमिका घेतली आहे.
Russia-Ukraine War : युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेले युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियन सैन्याला माघारी बोलावण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मध्यरात्री मतदान पार पडलं. यावेळी भारत आणि चीननं पुन्हा एकदा तटस्थ भूमिका घेतली आहे. भारताने मतदान केलं नसलं तरी हिंसेचा भारताने विरोध केला आहे. युक्रेनमधील परिस्थितीमुळे चिंतेत असल्याचे भारताने म्हटलं आहे. युद्ध कोणत्याही समस्येवर तोडगा नाही, त्यामुळे हिंसाचार थांबावा तसंच शत्रुत्व तात्काळ दूर व्हावं यासाठी प्रयत्न केले जावेत असंही भारताने नमूद केलं आहे. या प्रस्तावावर 15 पैकी 11 देशांनी मतदान केलं नाही. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी भारताकडे मदत मागितली होती. मात्र भारताने तटस्थ भूमिका घेतल्याने अमेरिका नाराज होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नाटोकडूनंही युक्रेनला थेट लष्करी मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धात युक्रेन सध्या एकटं पडल्याचं पाहायला मिळत आहे.
चर्चेतून तोडगा काढण्याबाबत संकेत
युद्ध थांबवून चर्चेनं मार्ग काढला जावा अशी मागणी जगभरातून होत असताना एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेन सरकारनं शुक्रवारी चर्चेतून तोडगा काढण्याबाबत संकेत दिले आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेसाठी वेळ आणि स्थळ निश्चित करण्याबाबत अद्याप चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. दुसरीकडे किव्हमधील अधिकाऱ्यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केलं आहे. दशकातील सर्वात वाईट युरोपीय सुरक्षा संकटात रशियन सैन्याला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी आणि राजधानीचे रक्षण करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलेन्स्की यांचे प्रवक्ते सर्गेई न्याकिफोरोव यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे की, आक्रमण सुरु झाल्यानंतर चर्चेतून मार्ग काढण्याबाबत आशेचं पहिलं किरण दिसू लागलं आहे. सर्गेई न्याकिफोरोव यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे की, युक्रेन युद्धविराम आणन शांततेसाठी चर्चा करण्यासाठी तयार होतं आणि आहे. त्यांनी म्हटलं की, युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेसाठी स्थळ आणि वेळ निश्चित करण्याबाबत चर्चा सुरु आहे.
मी इथेच आहे, कीवमध्ये आहे. युक्रेनची रक्षा करण्यासाठी लढतोय- व्होदिमर झेलेन्स्की
रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवच्या उंबरठ्यावर पोहोचलं असताना युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की हे भूमिगत झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता त्याला पूर्णविराम मिळाला असून आपण राजधानी कीवमध्येच आहे, युक्रेनची रक्षा करतोय असा संदेश देत व्होदिमर झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे युक्रेनने अद्याप हार मानली नाही, किंवा रशियासमोर शरणागती पत्करली नाही हे स्पष्ट झालंय. युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. युक्रेनियन भाषेत असलेला हा व्हिडीओ 33 सेकंदांचा आहे. त्यामध्ये ते म्हणतात, मी इथेच आहे, कीवमध्ये आहे. युक्रेनची रक्षा करण्यासाठी लढतोय.
युक्रेनच्या अध्यक्षांचे जगभरातील देशांना आवाहन
युक्रेनमधील लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून लावण्याचा आणि देशावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रशियाचा असून त्या विरोधात जगभरातील देशांनी युक्रेनच्या मदतीला यावं असं आवाहन युक्रेनचे अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी केलं आहे. तसेच अमेरिका आणि युरोपने रशियावरील आर्थिक निर्बंध हे अधिक कडक करावेत अशीही मागणी त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या:
- Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन वादावर केवळ संवादातून मार्ग निघेल; पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदींचे आवाहन
- Russia-Ukraine: थोडा जरी आत्मसन्मान शिल्लक असेल तर इम्रान खाननी रशिया दौरा रद्द करावा: शशी थरूर
- Russia-Ukraine Crisis: रशियाचं वर्तन हे 'नाझी जर्मनी'सारखं; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोदिमर झेलन्स्की यांचा आरोप