UNHRC : रशियासह 'या' देशांना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधून बाहेरचा रस्ता? आज मतदान
UNHRC : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधून (UNHRC) रशिया, चीन आणि पाकिस्तानला बाहेर काढा, अशी मागणी करण्यात आली आहे.
UNHRC Voting : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधून (UNHRC) रशिया, चीन आणि पाकिस्तानला बाहेर काढा, अशी मागणी करण्यात आली आहे. युनायटेड नेशन्स वॉचचे कार्यकारी संचालक हिलेल न्युअर यांनी काल बुधवारी ही मागणी केली. या संदर्भात आज गुरुवारी यूएनमध्ये मतदान होणार आहे. यानंतर या देशांना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये (UNHRC) ठेवायचं की नाही याबाबत स्पष्टता येणार आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशियाच्या निलंबनाचा प्रस्ताव अमेरिकेनं ठेवला आहे. भारतीय वेळेप्रमाणे आज सायंकाळी 7.30 वाजता संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये General Assembly मध्ये यावर मतदान होणार आहे.
रशियन सैनिकांकडून युक्रेममध्ये हल्ले सुरुच आहेत. या हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला आणि मानवाधिकारांचे उल्लंघन यावर ही मागणी करण्यात आली आहे. 14व्या जिनिव्हा शिखर परिषदेसाठी प्रतिनिधींचे स्वागत करताना न्युअर म्हणाले होते की, इतिहासात ही दुसरी वेळ आहे की काही UNSC सदस्यांना परिषदेतून बाहेर काढले जाऊ शकते. यामध्येच अमेरिकेने जाहीर केले आहे की, आम्ही आणि इतर युरोपीय देश युक्रेनसाठी एकत्र काम करू.
न्युअर म्हणाले की, रशियाने छळलेल्या युक्रेनला सक्षम केले पाहिजे. मानवाधिकार आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी रशियाला परिषदेतून निलंबित करण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. न्युअर यांनी परिषदेतील गैर-लोकशाही देशांच्या सदस्यत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, रशियाला मानवाधिकार परिषदेतून काढून टाकले जाण्याची खात्री आहे, कारण काहीच सदस्य त्यांच्या बाजून मतदान करतील.
अमेरिकन राजदूताने रशियाचा केला विरोध
मंगळवारी संयुक्त राष्ट्रातील अमेरिकन राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड म्हणाल्या होत्या की, मानवी हक्कांचा आदर वाढविण्याचा उद्देश असणाऱ्या परिषदेत रशियाने असू नये. परिषदेतील सदस्यत्वाचा वापर करून रशिया मानवाधिकारांची काळजी घेतो, असा प्रचार करत आहे. परंतु रशियाच्या परिषदेतील सहभागामुळे या संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत असून, संपूर्ण संयुक्त राष्ट्राला हानी पोहोचत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha