Ram Mandir : आता अबुधाबीमध्ये 'जय श्रीराम' चा जयघोष दुमदुमणार! पंतप्रधान मोदी करणार पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन, जाणून घ्या सविस्तर
Ram Mandir In UAE : पंतप्रधान मोदी यावेळी UAE मधील भारतीय समुदायाच्या लोकांना देखील संबोधित करणार आहेत.
Ram Mandir In UAE : अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटना नंतर आता अबुधाबीमध्ये (Abu Dhabi) 'जय श्रीराम' चा जयघोष दुमदुमणार आहे. याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी हे यूएईचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचीही भेट घेतील. झायेद स्पोर्ट्स सिटी येथे एका कार्यक्रमात ते UAE मधील भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करतील.
पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर, 2015 पासूनची सातवी भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून दोन दिवसांसाठी संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, 2015 पासून पंतप्रधान मोदींची यूएईची ही सातवी भेट असेल. यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतील, तसेच पंतप्रधान मोदी आणि अल नाह्यान हे दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील. तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील.
दुबईत होणार जागतिक सरकारी शिखर परिषद
परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की पंतप्रधान दुबईत होणाऱ्या जागतिक सरकारी शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. 2024 मध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून सहभागी होतील आणि शिखर परिषदेत विशेष भाषण करतील. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, 'पंतप्रधान यूएईचे उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचीही भेट घेतील तसेच ते BAPS मंदिराचे उद्घाटनही करतील, त्यानंतर ते झायेद स्पोर्ट्स सिटी येथे एका कार्यक्रमाला संबोधित करतील. UAE मधील भारतीय समुदायाच्या लोकांना देखील संबोधित करतील.
भारत आणि UAE मधील संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, 'भारत आणि यूएई मजबूत राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांवर आधारित घनिष्ठ तसेच बहुआयामी संबंधांचा आनंद घेत आहेत.' ऑगस्ट 2015 मध्ये मोदींच्या यूएईच्या ऐतिहासिक भेटीनंतर, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारले गेले आहेत. सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीसाठी दोन्ही देश फेब्रुवारी 2022 मध्ये सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) आणि स्थानिक चलन सेटलमेंट (LCS) या प्रणालीवर स्वाक्षरी करतील तसेच सीमापार व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि AED (संयुक्त अरब अमिराती दिरहाम) च्या वापरास प्रोत्साहन देतील.