(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-3 च्या लँडिंगबाबत पाकिस्तानी जनता म्हणतेय 'अल्लाह करे वो...', पाहा व्हिडीओ
Chandrayaan 3 Moon Landing : रशियाचं लुना-25 अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळून कोसळलं आणि त्यांची चंद्रमोहिम अयशस्वी ठरली. त्यानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे.
पंजाब, पाकिस्तान : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर लँडिंगसाठी (ISRO Moon Mission) सज्ज झालं आहे. रशियाचं (Russia) लुना-25 (Luna-25) अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळून कोसळलं आणि त्यांची चंद्रमोहिम अयशस्वी ठरली. त्यानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे. 21 ऑगस्ट रोजी रशियाचं लुना-25 हे यान चंद्रावर उतरणार होतं. मात्र, त्याच्या एक दिवस आधीच ते चंद्रावर कोसळलं आणि रशियाची चंद्रमोहिम अयशस्वी ठरली. त्यानंतर आता इस्रोचं चांद्रयान-3 दोन दिवसानंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. यावेळी अवघ्या जगाचं लक्ष भारताकडे लागलं आहे. भारताच्या शेजारील देश पाकिस्तानी जनतेनं चांद्रयान-3 बाबत प्रतिक्रिया दिली आहे.
चांद्रयान-3 च्या लँडिंगबाबत पाकिस्तानी जनतेची प्रतिक्रिया
पाकिस्तानी युट्युबर शोएब चौधरीने पाकिस्तानी जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. पाकिस्तानी जनतेने भारताच्या चांद्रयान-3 बाबत प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी जनतेनं भारताच्या चांद्रयान-3 साठी शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानी नागरिकांनी म्हटलं आहे की, ''अल्लाह करो, भारताच्या चांद्रयान-3 ची चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग होऊ दे. भारताला या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये यश मिळू दे. हे लोक खूप मेहनत करतात. जर ते लोक मेहनत करत आहेत तर, अल्लाह त्यांना यश देवो.'' आणखी एका पाकिस्तानी व्यक्तीने म्हटलं की, ''यावेळी सर्व जग तंत्रज्ञानाच्या जगात प्रगती करत आहे. पण, आम्ही फक्त बघण्याव्यतिरिक्त काहीही करु शकत नाही.''
'भारताला चंद्रमोहिमेत यश मिळो'
पाकिस्तानी व्यक्तीने रशियाची चंद्रमोहिम अयशस्वी ठरल्यामुळे त्यावर दुख व्यक्त केलं आणि भारताला चंद्रमोहिमेत यश मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली. पाकिस्तानी जनतेनं स्वत:च्या देशावरच टीका केली आहे. एका पाकिस्तानी नागरिकाने म्हटलं की, येथे काही लोक बोलतात की, चंद्रावर जाऊन काय फायदा? पण या सर्व गोष्टी भविष्याच्या दृष्टीने आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने गरजेच्या आहेत. आणखी एका पाकिस्तानी नागरिकाने भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेचं कौतुक केलं आहे आणि भारतीय अतिशय हुशार असल्याचं म्हटलं आहे. '
पाहा व्हिडीओ : पाकिस्तानी जनतेची नेमकी प्रतिक्रिया काय?
23 ऑगस्टला चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार
भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 23 ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. सध्या चांद्रयान-3 चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे. आता विक्रम लँडरचा वेग हळूहळू कमी होईल आणि ते चंद्रावर उतरेल. इस्रोचं चांद्रयान-3 हे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे.