पाकिस्तानात सर्व भारतीय वाहिन्यांवर बंदी
इस्लामाबादः बॉलिवूडमधून पाकिस्तानी कलाकारांना टेकू न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये सर्व भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. हा नियम न पाळल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल, असा आदेशही जारी करण्यात आला आहे.
पेमरा म्हणजेच पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणाने सर्व चॅनेल्सला नोटीस बजावून आदेशाचं 15 ऑक्टोबरपासून पालन करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारने कालच ऑल इंडिया रेडिओ बलुच भाषेत कार्यक्रम सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर बॅकफूटवर जात पाकिस्तानने हा निर्णय घेतला.
काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारत-पाक तणाव वाढला असतानाच पेमराने हा अजब निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनधिकृत वाहिन्या बंद करण्यासाठी कारवाई हाती घेण्यात आली, असं पेमराने जाहीर केलं आहे. मात्र ही कारवाई केवळ भारतीय वाहिन्या बंद करण्यासाठीच हाती घेण्यात आली, असं बोललं जात आहे.