Independence Day: 'या' तीन कारणांमुळे पाकिस्तान एक दिवस आधीच स्वतंत्र झाला! काय आहे ती कहाणी?
पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्ट रोजी साजरा करतो तर भारत 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळालं, मग स्वातंत्र्याच्या उत्सवात एका दिवसाचा फरक का? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतो.
Pakistan Independence Day: पाकिस्तान (Pakistan) आज 14 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करत आहे. भारतीय स्वातंत्र्य विधेयक 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सादर करण्यात आलं. या विधेयकात भारताची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती प्रस्तावित होती. त्यानंतर 18 जुलै 1947 रोजी हे विधेयक स्वीकारण्यात आलं आणि 14 ऑगस्टला फाळणी झाल्यानंतर 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांचा जन्म झाला. दोन्ही देश मध्यरात्री अस्तित्वात आले. परंतु 15 ऑगस्ट ऐवजी पाकिस्तान आपला स्वातंत्र्य दिन एक दिवस आधी म्हणजेच, 14 ऑगस्टला साजरा करतो तर भारत 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो.
भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनामध्ये 1 दिवसाचा फरक
विशेष म्हणजे, या कायद्यात 15 ऑगस्टचाच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा स्वातंत्र्य दिन म्हणून उल्लेख आहे. त्यात म्हटलं आहे की, "15 ऑगस्ट 1947 पासून, भारतात अनुक्रमे भारत आणि पाकिस्तान म्हणून ओळखले जाणारे दोन स्वतंत्र अधिराज्य स्थापन केले जातील." पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद जिना यांनीही त्यांच्या रेडिओ भाषणात घोषणा केली की, पाकिस्तान 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करेल. त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जिना म्हणाले होते की, "15 ऑगस्ट हा पाकिस्तानच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा वाढदिवस आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या मातृभूमीसाठी महान बलिदान देणाऱ्या मुस्लिम राष्ट्राच्या नियतीच्या पूर्ततेचे हे प्रतीक आहे. आता प्रश्न असा आहे की, दोन्ही देश एकाच दिवशी अस्तित्वात आले तर मग त्यांच्या स्वातंत्र्यदिनात एका दिवसाचा फरक का?
14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागे हेच कारण
त्यावर्षी 15 ऑगस्ट हा इस्लामिक महिन्यातील रमजानचा शेवटचा शुक्रवार होता, त्यामुळे पाकिस्तानमधील मुस्लिमांसाठी हा दिवस खूप खास होता. दरम्यान, शब-ए-कदर त्या दिवशी पडत होती, जी अत्यंत पवित्र रात्र मानली जाते. या कारणास्तव पाकिस्तान 14 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो.
तसेच, पाकिस्तानने जुलै 1948 पर्यंत जारी केलेल्या स्मरणार्थ टपाल तिकिटांमध्ये 15 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन म्हणून उल्लेख केला आहे, कारण तो भारतासाठी आहे. पण त्याच वर्षी पाकिस्तानने आपला स्वातंत्र्यदिन भारताच्या एक दिवस आधी साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र, पाकिस्तान सरकारने आपला स्वातंत्र्यदिन भारतापेक्षा एक दिवस अगोदर का साजरा करण्यास सुरुवात केली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबत वेगवेगळी कारणं सांगितली जातात.
हेदेखील एक कारण
पाकिस्तानने एक दिवस अगोदर स्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागील एक कारण असेही सांगितले जाते की भारतातील स्वातंत्र्य कायद्यावर 15 ऑगस्ट 1947 रोजी नवी दिल्ली येथे 00:00 (IST) किंवा 05:30 (GMT) वाजता स्वाक्षरी करण्यात आली होती. असं म्हटलं जातं की, पाकिस्तानची वेळ भारतापेक्षा 30 मिनिटे पुढे आहे, म्हणून जेव्हा स्वातंत्र्य कायद्यावर स्वाक्षरी झाली तेव्हा पाकिस्तानमध्ये 14 ऑगस्ट होता.