(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan Financial Crisis : पाकिस्तानच्या डोक्यावर कर्जाचा वाढता डोंगर, कर्जाचा आकडा पोहोचला 50 लाख कोटींच्या पार
Pakistan Financial Crisis : पाकिस्तानच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. मीडिया रिपोर्टनुसार सप्टेंबर 2021 पर्यंत पाकिस्तानवरील कर्जाची रक्कम विक्रमी 50.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
पाकिस्तानवरील परदेशी कर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान देशावर एकूण 50.5 लाख कोटी (PKR) रुपयांचं परदेशी कर्ज आहे. कर्जाची ही रक्कम एकूण देशांतर्गत उत्पादन (GDP) पेक्षाही जास्त आहे.
रिपोर्टनुसार, तत्कालीन पाकिस्तान सरकारनं 20.7 लाख कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. तर, एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, इम्रान खान यांचं सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तानवरील कर्जाच्या रकमेत सातत्यानं वाढ होत आहे. पाकिस्तानी स्टेट बँकने बुधवारी सप्टेंबर 2021 पर्यंतची आकडेवारी जाहीर केली. ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशावरील वाढतं कर्ज आणि बिघडलेली आर्थिक परिस्थिती 'राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा' बनल्याचं सांगितलंय.
नव्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2021पर्यंत पाकिस्तान देशावरील कर्जाची रक्कम 50.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ज्यामध्ये मागील 39 महिन्यांमध्ये 20.7 लाख कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलंय. पाकिस्तानी वृत्तपत्र 'एक्सप्रेस ट्रिब्यून'नं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानवरील कर्ज 70 टक्क्यांनी वाढलं आहे. एकूण कर्जाची रक्कम पाहिल्यास पाकिस्तानमधील प्रत्येक नागरिकावर 2 लाख 35 हजार रुपयांचं कर्ज आहे. ही रक्कम जून 2018 मध्ये 1 लाख 44 हजार इतकी होती.
इम्रान खान यांनी घेतली होती कर्ज कमी करण्याची शपथ
पंतप्रधान इम्रान खान यांनी 2019 साली पाकिस्तानवरील कर्ज 20 लाखांपर्यंत कमी करण्याची शपथ घेतली होती. इम्रान खान यांनी आधीच्या सरकारच्या कारभारावर टीका करत त्यांच्या नेतृत्त्वात देशावरील कर्ज कमी होईल, असा दावा केला होता.
हे ही वाचा :
- Pakistan Financial crisis : पाकिस्तानकडे देश चालवायला पैसा नाही, पंतप्रधान इम्रान खान यांची कबुली
- Covid-19 Pandemic: दक्षिण आफ्रिकेत आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट
- लस घेतली तरीही मास्क, सोशल डिस्टन्सिंग आवश्यक, WHO चं आवाहन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha