Libya Flood: लिबियामध्ये धरण फुटून महापूर, अर्ध शहर गेलं वाहून; जवळपास 20 हजार जणांचा मृत्यू, पाण्यावर तरंगतायत मृतदेह
Libya Flood: लिबियामध्ये चक्रीवादळ, महापूर आणि धरणफुटी यांच्यामुळे अक्षरश: हाहा:कार माजला आहे. या सर्व भीषण परिस्थितीत आतापर्यंत जवळपास 20 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
Libya Flood: संपूर्ण जगाला हादरवणारी घटना लिबियामध्ये घडली आहे. लिबियात आलेल्या महापुरामुळे (Flood) डेरना शहर उद्धवस्त झालं आहे. महापुरामुळे डेरना शहरातील दोन धरणं फुटली आणि सव्वा लाख लोकसंख्या असलेलं संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं. असंख्य लोक, त्यांची घरंदारं आणि संपूर्ण संसार पाण्यात वाहून गेला. या दुर्दैवी घटनेत जवळपास 20 हजार जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण बेपत्ता आहेत.
लिबियातील डर्ना शहरात महापुरामुळे विध्वंस
चक्रीवादळ, महापुरामुळे तुटलेल्या इमारती, साचलेले मातीचे ढिग, एकमेकांवर पडलेल्या गाड्या शहरात पसरलेल्या दिसत आहेत. या भयावह परिस्थितीमुळे साचलेल्या चिखलात पाऊल टाकलं तर कधी पायाखाली कुणाचा मृतदेह सापडेल, हेही कुणालाच सांगता येत नाही. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून 40 हजारांवर जाण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
महापुरामुळे दोन धरणं फुटली
लिबियात राहणाऱ्या लोकांना आधीच आठवडाभरापासून चक्रीवादळाचा सामना करावा लागत होता, त्यातच धरणं फुटल्याने संपूर्ण डेरना शहराचा विध्वंस झाला. महापुरात गुरं, माणसं, घरं, सर्वकाही वाहून गेलं. गावांना नदीचं स्वरुप आलं. धरण फुटल्याने आतापर्यंत लिबियातील 40 हजार लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांचे मृददेह देखील सापडत नाही, हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. जे या परिस्थितून वाचले, त्यांची मानसिक स्थिती हलली आहे, लोकांच्या मनावर याचा प्रचंड परिणाम झाला. आपल्या प्रियजनांना शोधण्यासाठी या लोकांचा जीव कासावीस होत आहे.
संपूर्ण शहरात चिखल अन् त्याखाली फसले मृतदेह
लिबियात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे, त्याखाली मृतदेहांचा खच पडला आहे. डेरना शहरातील जे लोक महापुरातून वाचले, त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. हा महापूर इतका भयंकर होता की मृतदेह शोधणं कठीण झालं आहे. संपूर्ण शहर जलमय झाल्याने डोंगराळ भाग खोदून उंचावर मृतदेह पुरले जात आहेत. मृतदेह सडत असल्याने तात्काळ त्यांचं दफन करण्यात येत आहे. चिखलात खचलेले मृतदेह पाहून लोक घाबरले आहेत.
दोन धरणांमध्ये होतं जवळपास 2 करोड टन पाणी
डेरना शहरात युगोस्लाव्हियाच्या कंपनीने 1970 मध्ये दोन धरणं बांधली होती. पहिलं धरण 75 मीटर उंच होतं, ज्यात 1.80 कोटी क्युबिक मीटर पाणी साठवलं जात होतं. तर दुसरं धरण 45 मीटर उंच होतं, ज्यात 15 लाख क्युबिक मीटर पाणी साचत होतं. प्रत्येक क्युबिक मीटर पाण्यात एक टन वजन असतं, त्याप्रमाणे दोन्ही धरणात सुमारे 2 कोटी टन पाणी होतं. या धरणांना लागूनच खाली डेरना शहर वसवलेलं होतं.
लिबियात आठवडाभरापासून अतिवृष्टी
लिबियातील काही भागात डॅनियल वादळामुळे एक आठवडा अतिवृष्टी झाली. वादळामुळे झालेल्या पावसात ही दोन्ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली. त्यात ही दोन्ही धरणं सिमेंटने बांधण्यात आली होती. वादळामुळे धरणांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी भरलं, धरण ओव्हरफ्लो झालं. धरणाची वेळोवेळी देखभाल न केल्यामुळे त्याचं बांधकाम देखील मजबूत नव्हतं आणि त्यामुळे ते अचानक फुटलं. धरणं फुटून त्याखाली वसलेलं संपूर्ण डर्ना शहर वाहून गेलं
महत्त्वाच्या इतर बातम्या :