क्रूर कृत्यासाठी प्रसिद्ध असलेले उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांना जनतेसमोर अश्रू अनावर, कारण...
उत्तर कोरियाने अण्वस्त्रांसह सज्ज असलेल्या 22 चाकांच्या वाहनावर जागतिक स्तरावरील अण्वस्त्र क्षेपणास्त्र Hwasong -15 जगासमोर आणलं. हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या कोणत्याही कोपऱ्यात हल्ला करण्यास सक्षम आहे, असा तज्ञांचा दावा आहे.
प्योंगयांग : आपल्या क्रूर कृत्यासाठी प्रसिद्ध असलेले उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी देशातील जनतेसमोर दिलगिरी व्यक्त केली आहे. यावेळी किम यांच्या डोळ्यात अश्रू देखील आले होती. कोरोना व्हायरसच्या साथीच्या वेळी मी जनतेसोबत उभा राहू शकलो नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असं किम जोंग यांनी म्हटलं. किम जोंग उनने आपल्या पक्षाची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाषण करताना भावूक झाले.
किम जोंग उन यांनी आपल्या भाषणादरम्यान कबूल केले की उत्तर कोरियाच्या लोकांच्या विश्वासावर ते खरे उतरु शकले नाहीत आणि त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. हे सांगताना किम जोंग यांनी चष्मा काढून त्यांचे अश्रू पुसले. आपल्या पूर्वजांनी केलेल्या महान कार्याची आठवण म्हणून किम म्हणाले की, मला हा देश चालवण्याची जबाबदारी दिली गेली असली तरी माझे प्रयत्न आणि प्रामाणिकपणा माझ्या लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी पुरेसा नाही. किम यांच्या या वागणुकीवर सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Hwasong-15 मिसाईल जगासमोर आणले
आपल्या भाषणात किम जोंग उन म्हणाले की जगभरातील लोक कोरोनामुळे नाराज आहेत. यावेळी दक्षिण कोरियाबरोबर संबंध सुधारण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमावेळी उत्तर कोरियाने अण्वस्त्रांसह सज्ज असलेल्या 22 चाकांच्या वाहनावर जागतिक स्तरावरील अण्वस्त्र क्षेपणास्त्र Hwasong -15 जगासमोर आणलं. हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या कोणत्याही कोपऱ्यात हल्ला करण्यास सक्षम आहे, असा तज्ञांचा दावा आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी नुकतेच आपल्या लष्करी परेडमध्ये हे क्षेपणास्त्र दाखवले. तज्ज्ञांनी सांगितले की हे क्षेपणास्त्र जगातील सर्वात लांब क्षेपणास्त्रांपैकी एक आहे.