देव खरंच आहे काय? हार्वडच्या शास्त्रज्ञानं गणितीय सूत्रच सांगितलं, जगभरात होतेय चर्चा, काय म्हणतायत डॉ सून?
हार्वर्ड विद्यापीठातील एका वैज्ञानिकानं देव आहे की नाही या प्रश्नाला वेगळ्याच पद्धतीनं उत्तर दिल्यानं या शास्त्रज्ञाची सध्या जगभरात चांगलीच चर्चा रंगलीय

New Delhi: श्रद्धा असो किंवा नसो खरंच देव आहे का? हा प्रश्न एकदातरी माणसाच्या मनात डोकावतोच. कितीतरी शतकांपासून देव आहे की नाही? या प्रश्नाच्या शोधात मानव भटकतोय. देव आहे अशी भाबडी श्रद्धा मनात धरून चालायला काय जातंय असं वाटणारेही अनेक. तर दुसऱ्या बाजूला विज्ञानाची कास धरत असं काही नसतो हो..म्हणणाऱ्यांचीही कमी नाही. मात्र, आता हार्वर्ड विद्यापीठातील एका वैज्ञानिकानं देव आहे की नाही या प्रश्नाला वेगळ्याच पद्धतीनं उत्तर दिल्यानं या शास्त्रज्ञाची सध्या जगभरात चांगलीच चर्चा रंगलीय. (mathematical Formula for God Presence)
हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विली सून (Dr. Willie Soon) यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा गणिताच्या फॉर्म्युल्याद्वारे पुरावा देण्याचा दावा केला आहे. त्यांनी ‘फाइन ट्यूनिंग आर्गुमेंट’ वर भर दिला आहे आणि सांगितले की, ब्रह्मांडाचे नियम इतके अचूक आणि संतुलित आहेत की त्यामुळेच जीवन अस्तित्वात आहे. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपासून ते पदार्थ आणि ऊर्जेचा अचूक समतोल यामुळेच ब्रम्हांडाचा समतोल टिकून असल्याचं ते सांगतात.
नक्की म्हणणं काय आहे या शास्त्रज्ञाचं?
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, डॉ. विली सून एक प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि एयरोस्पेस इंजिनिअर आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की, ब्रह्मांडात पदार्थ आणि प्रतिपदार्थ (Antimatter) संपूर्णपणे समान प्रमाणात असले असते तर जीवन अस्तित्वातच येऊ शकले नसते. मात्र, या दोघांमध्ये असलेली असमानता ही एका उच्च शक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा देते. त्यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ पॉल डिराक यांच्या एका गणितीय समीकरणाच्या मदतीने प्रतिपदार्थ (एंटीमॅटर) असल्याचे भाकीत केले होते. ज्यामुळे जगभरातील वैज्ञानिकांना आश्चर्यचकित केले. त्याचा हवाला देत डॉ सून सांगतात, काही गणितीय समीकरणे पहिल्यांदा अवघड वाटू शकतात, मात्र ती ब्रह्मांडाच्या गूढ सत्यांना उलगडू शकतात.
जर हा फॉर्म्युला खरा ठरला तर?
जर डॉ. सून यांनी मांडलेले गणितीय समीकरण सत्य ठरले, तर विज्ञान आणि आध्यात्मिकता यांना एक नवी दिशा मिळू शकते. ईश्वराच्या अस्तित्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. मात्र, हा मुद्दा सध्या वादग्रस्त ठरत आहे आणि वैज्ञानिक तसेच धार्मिक समुदायांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा:
























