Iran Attak Qatar : इराणकडून अमेरिकेच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर, कतारमधील सर्वात मोठ्या एअर बेसवर डागले बॅलेस्टिक मिसाईल
Iran Attack on US : अल उदीद या अमेरिकेच्या कतारमधील एअर बेसवर इराणने हल्ला केला आहे. या ठिकाणी इराणने सहा बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्याची माहिती आहे.

Iran Attack on US Military Bases In Qatar : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणने प्रत्युत्तर दिलं असून कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळाला निशाणा बनवत सहा क्षेपणास्त्रे डागली आहेत. कतारची राजधानी दोहापासून जवळ असलेल्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर आठ हजाराहून अधिक सैन्य तैनात असते. त्याच ठिकाणी इराणने हल्ला केला आहे. तरेच इराणने अमेरिकेच्या इराक आणि बहरीनमधील लष्करी तळांनाही लक्ष्य केल्याची माहिती आहे.
अमेरिकेने ऑपरेशन मिडनाइट हॅमर अंतर्गत इराणातील न्यूक्लियर सुविधा असलेल्या जसे फोर्डो, नटनझ आणि इस्फाहान या ठिकाणांवर हल्ला केला होता. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा इराणने केली होती. कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअर बेस, अल उदीद आहे. त्यामुळे इराण या ठिकाणी हल्ला करु शकतो अशी शक्यता होती.
इराणच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कतारने त्या देशात हवाई क्षेत्र बंदीचा आदेश जारी केला. त्याचवेळी अमेरिका आणि ब्रिटनने कतारमधील त्यांच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले होते. त्यानंतर काहीच वेळात इराणने अल उदीदवर हल्ला केला. इराणने अमेरिकेच्या या लष्करी तळावर सहा क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती आहे.
❗️ WATCH interceptor SLAM into Iranian missile in Qatar’s skies
— RT (@RT_com) June 23, 2025
Iran’s launched Operation ‘ANNUNCIATION OF VICTORY' against American bases in Iraq and Qatar — Tasnim https://t.co/Ot7i229oiB pic.twitter.com/xlCP3WcUAJ
कतारमध्ये अमेरिकन लष्कराचे मुख्यालय
अल उदीद हे कतारच्या दोहा या राजधानीपासून अवघ्या 20 मैल दक्षिणेला आहे. अल उदीद हे अमेरिकेचे पश्चिम आशियातील सर्वात मोठे हवाई तळ आहे. या ठिकाणी सुमारे आठ ते दहा हजार अमेरिकन सैन्य आहे. त्याचप्रमाणे अल उदीद हे पश्चिम आशियातील सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांडचे मुख्यालय आहे.
संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे सुमारे 40 हजार सैन्य तैनात आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेच्या सर्व लष्करी तळांवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसात त्यांनी आता कतार, इराक आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला केला आहे.
भारतीय दूतावासाने सूचना जारी केली
कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर, भारतीय दूतावासाने सूचना जारी केली आहे. भारतीय दूतावासाने तेथे राहणाऱ्या भारतीय समुदायाला सतर्क राहण्याचे आणि घरात राहण्याचे आवाहन केले आहे. भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, 'स्थानिक बातम्या, सूचना आणि मार्गदर्शनाचे पालन करा. आमच्या सोशल मीडिया चॅनेलद्वारे देखील अपडेट्स मिळवत रहा.'























