International Mother Language Day : ...म्हणून साजरा करतात 'जागतिक मातृभाषा दिन', जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व
International Mother Language Day : दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो.
International Mother Language Day : आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक मातृभाषा दिवस युनेस्कोच्या वतीनं (UNESCO) 1999 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला. त्याला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने 2002 साली मान्यता दिली.
मराठी, हिंदी आणि भारतीय भाषांबद्दल बोलत असताना जागतिक स्तरावरही अनेक मातृभाषा आहेत. या जगभरातील मातृभाषा जपल्या जाव्यात या निमित्ताने आज जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राकडून (UN) हा दिवस साजरा करायला सुरूवात झाली. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वापराने जगभरातील अनेक मातृभाषा लोप पावत चालल्याचे चित्र आहे. मात्र, असे होऊ नये यासाठी युनेस्कोने पुढाकार घेत मातृभाषा आणि त्याबरोबर संबंधित संस्कृती टिकावी यासाठी आजच्या दिवसाची निवड केली आहे. त्यामुळे जगभरात आजचा दिवस International Mother language day म्हणून साजरा केला जातो.
जगात सुमारे 7 हजार भाषा बोलल्या जातात. भारतातही प्रामुख्याने 22 भाषा बोलल्या जातात. भारतात जवळपास 1300 च्या आसपास मातृभाषा आहेत. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने शिक्षण आणि साहित्याशी निगडित लोक विविध भाषांबद्दल चर्चा करतात. मातृभाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे, भाषिक विविधता जोपासणे, त्याचे महत्त्वदेखील अधोरेखित केले जाते. जगात काही मातृभाषा लोप पावत असल्याबद्दलही जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जाते. मातृभाषेचे संवर्धन करणे, मातृभाषेचा प्रचार-प्रसार करण्याबाबत धोरण ठरवले जाते.
21 फेब्रुवारी रोजी का साजरा करतात मातृभाषा दिवस
भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते. पश्चिम बांगलादेशमध्ये उर्दू आणि पश्चिम बांगलादेशमध्ये बंगाली भाषिकांचे प्रमाण अधिक होते. तत्कालीन पाकिस्तान सरकारने भाषा धोरण लागू करून पाकिस्तानची अधिकृत भाषा म्हणून उर्दूला मान्यता दिली होती. पाकिस्तान सरकारच्या या धोरणाच्या विरोधात ढाका विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. ढाका विद्यापीठातील आंदोलनावर पोलिसांनी 21 फेब्रुवारी 1952 रोजी गोळीबार केला होता. आंदोलनाच्या परिणामी पाकिस्तान सरकारला नमतं घ्यावं लागले आणि बंगाली भाषेलाही मान्यता दिली.
महत्त्वाच्या बातम्या :