India China : श्रीलंकेच्या आडून चीननं आपला अजेंडा चालवू नये; भारतानं चीनला सुनावलं
India China : भारत श्रीलंकेच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप चीननं केला होता. या आरोपावर भारतीय दूतावासाने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Indian High Commission to Sri Lanka : भारत (India) आणि चीनचा (China) वाद सर्वज्ञात आहे. आता श्रीलंकेवरून भारत आणि चीन पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. श्रीलंकेवरून भारत आणि चीनमधील वाद चव्हाट्यावर पुन्हा एकदा आला आहे. श्रीलंकेच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याच्या आरोप चीननं केला होता. चीनच्या या आरोपावर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतानं चीनला फटकारत म्हटलं आहे की, 'श्रीलंकेच्या आडून चीननं आपला अजेंडा चालवू नये.' श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे चिनी हेरगिरी जहाज तैनात करण्यावरून चीनसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावरून चीननं भारताला लक्ष्य करत याप्रकरणी भारत हस्तक्षेप करत असल्याचं चीननं म्हटलं होतं. यावरून आता भारतानं चीनला चांगलंच फटकारलं आहे.
काय म्हणाले चीनचे राजदूत?
चीननं श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे हेरगिरी जहाज तैनात केलं. हंबनटोटा बंदरावर चीनचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि उपग्रह निरीक्षण जहाज 'युआन वांग-5' तैनात केल्याबद्दल भारताने आक्षेप नोंदवला होता. याचा संदर्भ देत श्रीलंकेतील चीनचे राजदूत की झेनहोंग यांनी शुक्रवारी म्हटलं की, कोणताही पुरावा नसताना तथाकथित सुरक्षा चिंतेवर प्रतिबंध हा श्रीलंकेच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्यामध्ये उघड हस्तक्षेप आहे. यावरून वाद निर्माण केल्याबद्दल भारतीय उच्चायुक्तांनी शनिवारी कोलंबोमधील चिनी राजदूताला सुनावलं.
श्रीलंकेतील चीनचे राजदूत की झेनहॉंग यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, 'श्रीलंकेने चीनच्या जहाजाला हंबनटोटा येथे येण्याची परवानगी देऊन आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं उत्तम उदाहरण दिलं आहे.श्रीलंकेने चीनच्या जहाजाला हंबनटोटा येथे तैनातीसाठी परवानगी दिल्याने चीनला आनंद झाला आहे. बीजिंग आणि कोलंबो संयुक्तपणे एकमेकांचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडता सामायिक करण्यासाठी मदत करतात.' यावेळी चिनी राजदुतांनी भारताचं नाव न घेता टीका केली होती. कोणत्याही पुराव्याशिवाय तथाकथित सुरक्षेवर आधारित 'बाह्य अडथळे' हा श्रीलंकेच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप आहे, असं चिनी राजदूत म्हणाले होते. यामध्ये बाह्य अडथळे म्हणजे भारतावर नाव न घेता टीका होती.
भारतीय राजदुतांनी चिनी राजदुताला 'असं' फटकारलं
चीनच्या राजदूताच्या वक्तव्याचा संबंध भारताने चीनच्या वृत्तीशी जोडला आहे. भारतीय राजदुतांनी चीनला फटकारत म्हटलं आहे की, 'श्रीलंकेला मदत आणि पाठिंब्याची गरज आहे, पण इतर कोणत्याही देशाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी नाही. अनावश्यक दबाव आणि विवाद टाळणं आवश्यक आहे. चीनचा अजेंडा पुढे नेण्यासाठी अनावश्यक दबाव किंवा अनावश्यक वादात अडकू नका. श्रीलंकेच्या आडून चीननं आपला अजेंडा चालवू नये.'
श्रीलंकेतील भारतीय दूतावासाने ट्विट करत म्हटलं की, 'आम्ही चीनच्या राजदूतांनी केलेली टीका पाहिली. चीनच्या राजदूतांकडून मूलभूत राजनैतिक शिष्टाचाराचं उल्लंघन हे वैयक्तिक वैशिष्ट्य असू शकते किंवा मोठ्या राष्ट्रीय दृष्टिकोनाचं प्रतिबिंबही असू शकते. शेजारील देशांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन चीनच्या वागणुकीवर प्रभाव पाडत असावा.'
चीनबाबत भारताचा जगाला इशारा
भारतानेही श्रीलंकेचं उदाहरण देऊन संपूर्ण जगाला चीनबाबत इशारा दिला आहे. चिनी कर्जाबाबत इशारा देत भारतानं म्हटलं आहे की, चीनचा कर्जामुळे चालणारा अजेंडा आता एक मोठं आव्हान बनलं आहे. अलीकडच्या घडामोडी हा याचाच एक इशारा आहे. विशेषतः लहान देशांसाठी हे एक आव्हान ठरणार आहे. चिनी राजदूतांनी श्रीलंकेसोबत संबंध असणाऱ्या इतर देशांचा निषेध केला होता. यावर भारतानं म्हटलं आहे की, 'श्रीलंकेला दुसऱ्या देशाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी अवाजवी दबाव किंवा अनावश्यक वाद निर्माण करण्याऐवजी इतर देशाचं समर्थन मिळवण्याची गरज आहे.'