(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maldives-China Relations: भारत मालदीवचा वाद चीनला ठरतोय फायदेशीर? राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी घेतली राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट, 20 करारांवर स्वाक्षऱ्या
Maldives-China Relations: मुइज्जू यांनी चीनमध्ये पोहोचताच कौतुक करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, या वर्षी चीनला भेट देणारे ते पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख आहेत, हे चांगले वाटते.
मुंबई : सध्या भारत आणि मालदीवमध्ये वादाचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मालदीवचे (Maldives) राष्ट्रपती मोहम्मद मुइझू यांनी बुधवारी 10 जानेवारी रोजी चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (xi jinping) यांची भेट घेतली. तसेच त्यांनी देशांनी पर्यटन सहकार्यासह 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. याशिवाय, दोन्ही देशांनी आपले द्विपक्षीय संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत वाढवण्याची घोषणा केली.
अलीकडेच मालदीवच्या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्यानंतर मालदीव आणि भारत यांच्यातील वाद वाढला होता. दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चीनच्या दौऱ्यावर आहेत. शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी सांगितले की, मी चीनला त्यांच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर आलो आहोत याचा मला सन्मान वाटत आहे.
चीनचे केले कौतुक
मुइज्जू चीनमध्ये पोहोचताच त्यांनी चीनचे कौतुक करण्यास सुरुवात केली. त्यांनी म्हटलं की, यंदाच्या वर्षात चीनला भेट देणारे ते पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख आहेत ही भावना आनंद देणार आहे. यावरून दोन्ही बाजू द्विपक्षीय संबंधांना किती महत्त्व देतात हे दिसून येते. शिन्हुआच्या अहवालानुसार राष्ट्रीय परिस्थितीनुसार विकसित होण्यासाठी मालदीवला चीन पाठिंबा देतो यावर शी यांनी भर दिला. मालदीवचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी चीनचे समर्थन असल्याचे ते म्हणाले.
बेल्ट अँड रोडचाही या करारात समावेश
मालदीवच्या राष्ट्रपतींनी यासंदर्भात ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, आज दुपारी मालदीव आणि चीनच्या सरकारांमध्ये 20 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि दोन्ही राष्ट्राध्यक्ष यावेळी उपस्थित होते.या करारांमध्ये पर्यटन सहकार्य, आपत्ती जोखीम कमी करणे, सागरी अर्थव्यवस्था, डिजिटल अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक मजबूत करणे आणि बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह यांचा समावेश आहे.
चीननेही मालदीवला अनुदान सहाय्य देण्याचे मान्य केले आहे परंतु रक्कम जाहीर करण्यात आली नाही. मुइज्जू आणि त्यांची पत्नी साजिदा मोहम्मद यांचे बीजिंगमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष शी आणि त्यांची पत्नी पेंग लियुआन यांनी त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते.
पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टीप्पणीनंतर भारतात बायकोट मालदीव हे ट्रेंन्ड झाले. मालदीव हा मुख्यत्वे पर्यटनावर अवलंबून असणार देश आहे. त्यामुळे भारतीय पर्यटकांच्या या निर्णयामुळे मालदीवला आर्थिकदृष्ट्या फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच चीनला दिलेल्या या भेटीमुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा :
BoycottMaldives नंतर मालदीव असोशिएशन ऑफ टुरिज्मला आली जाग, म्हणाले भारत नेहमीच...