(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi Japan Visit: भारत IPEF मध्ये झाला सामील; पंतप्रधान मोदी म्हणाले: मित्र राष्ट्रांसोबत मिळून करू काम
India Joins IPEF Launch: भारत सोमवारी अमेरिकेच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क (IPEF) मध्ये सामील झाला.
India Joins IPEF Launch: भारत सोमवारी अमेरिकेच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क (IPEF) मध्ये सामील झाला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, भारत सर्वसमावेशक आणि लवचिक फ्रेमवर्क बनवण्यासाठी काम करेल, जेणेकरून या क्षेत्रात शांतता आणि समृद्धी नांदेल. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायदान यांनी सोमवारी 12 इंडो-पॅसिफिक देशांसोबत नवीन व्यापार करार केला. ज्याचे उद्देश त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करणे हा आहे.
यावेळी बोलताना जो बायडन म्हणाले आहेत की, युनायटेड स्टेट्स या नवीन उपक्रमात आधीपासून गुंतले आहे आणि या क्षेत्रात सकारात्मक भविष्य निर्माण करण्याच्या प्रयत्नांसाठी वचनबद्ध आहे. आयपीईएफच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भाग घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज या महत्त्वाच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला आनंद होत आहे. ते म्हणाले की, इंडो-पॅसिफिक आर्थिक वास्तुकला क्षेत्राला जागतिक आर्थिक विकासाचे इंजिन बनवण्याची आमची सामूहिक इच्छा दर्शवते.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
सर्वसमावेशक आणि मजबूत इंडो-पॅसिफिक आर्थिक वास्तुकला तयार करण्यासाठी भारत सर्वांसोबत काम करेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते म्हणाले की, माझा विश्वास आहे की आपल्या दरम्यान लवचिक पुरवठा साखळीत विश्वास, पारदर्शकता आणि समयसूचकता हे तीन मुख्य स्तंभ असले पाहिजेत. या फ्रेमवर्कमुळे या तीन स्तंभांना बळकट करण्यात मदत होईल आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात विकास, शांतता आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
हे देश IPEF मध्ये सामील झाले
या उपक्रमात सामील झालेल्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, भारत, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, न्यूझीलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी मी राष्ट्राध्यक्ष बायडन यांचे आभार मानतो. इंडो-पॅसिफिक हे उत्पादन, आर्थिक गतिविधी, जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीचे केंद्र आहे. इतिहास साक्षी आहे की, शतकानुशतके भारत-पॅसिफिक प्रदेशातील व्यापार प्रवाहाचे प्रमुख केंद्र आहे.