(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India China Talk : भारत-चीन यांच्यातील बैठक तब्बल आठ तासांनी संपली, पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर चर्चा
India China Meeting : भारत आणि चीन यांच्यादरम्यान पूर्व लडाखमधील उर्वरित भागातील सैन्य माघारीबाबत लष्करी पातळीवरील उच्चस्तरीय चर्चेची तेरावी फेरी पार पडली. या बैठकीत तब्बल आठ तास चर्चा झाली.
India China Meeting : पूर्व लडाखमधील वादावर काल (रविवारी) भारत-चीन (India-China) मध्ये तेरावी महत्त्वाची बैठक पार पडली. भारत (India) आणि चीन (China) यांच्यात काल, रविवारी पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर लष्करी पातळीवर चर्चेची तेरावी फेरी झाली. ही बैठक तब्बल आठ तास चालली. दरम्यान, या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर आणि काय चर्चा झाली, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि चीन या दोन्ही देशांत लष्करी पातळीवर काल तेराव्या फेरीची बैठक पार पडली. संध्याकाळी 7 वाजता ही बैठक पार पडली. सकाळी 10.30 वाजता चीनमधील पीएलए सेनेच्या मेल्दो गॅरिसनमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीवरील तणाव संपवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी पातळीवर तेराव्या फेरीची बैठकआयोजित करण्यात आली होती. ही बैठक पीएलए सैन्याच्या मोल्दो येथे पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाखच्या गरम पाण्याच्या झऱ्यापासून मागे हटण्यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. 12 फेऱ्यांच्या बैठकीदरम्यान, पूर्व लडाखला लागून असलेल्या वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) फिंगर एरिया, कैलाश हिल रेंज आणि गोगरा भागात विघटन करण्यात आलं होतं. पण हॉट स्प्रिंग, डेमचोक आणि डेपसांग मैदानावर अजूनही तणाव कायम आहे. याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
भारताच्या बाजूने, लेह स्थित 14व्या कोर (फायर अँड फ्युरी कॉर्प्स) चे कमांडर लेफ्टनंट जनरल पी.जी.के मेनन यांनी बैठकीत भाग घेतला होता. तर दक्षिणी झिंजियांग मिलिटरी डिस्ट्रिक्टचे कमांडर चिनच्या बाजूने बैठकीचे प्रतिनिधित्व करत होते.
चीनची नवी कुरापत
अरुणाचल प्रदेशजवळ असलेल्या एलएसी (LAC) वर चिनी सैनिकांना बंदी केल्याचं वृत्त मिळाल्यानंतर चीनमधील सरकारी पत्रकारांनी गलवान खोऱ्यातील हिंसेत ताब्यात घेतलेल्या भारतीय सैनिकांचे फोटो जारी केले आहेत. या फोटोंमध्ये चिनी सैन्याच्या ताब्यात भारतीय सैनिक आणि त्यांची हत्यारं दिसत आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेशातील यांगत्सेमध्ये चीनजवळ 200 सैनिकांनी एसएसीचं उल्लंघन केलं होतं. यादरम्यान, भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये फेसऑफ म्हणजेच, वाद निर्माण झाला होता. या संदर्भात काल म्हणजेच शुक्रवारी, वृत्त आलं की, या दरम्यान भारतीय लष्करानं चिनी सैनिकांना ओलीस ठेवलं आहे. तसेच, दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्सच्या फ्लॅग मिटिंगनंतरच त्यांची सुटका झाली होती. या घटनेनंतर चिनच्या काही सरकारी पत्रकारांनी गलवान खोऱ्यातील हिंसेच्या तब्बल 16 महिन्यांनंतर फोटो सोशल मीडियावर जारी केले आहेत. तसेच गलवान खोऱ्यातील हिंसाचारानंतर चिनी सैन्यानं त्या युद्धात भारतीय सैनिकांना ओलिस ठेवलं होतं, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
गलवान खोऱ्यातील हिंसाचारात दोन्ही देशांच्या सैनिकांनी समोरील देशाच्या सैनिकांना ओलिस ठेवलं होतं. त्यानंतर लष्करी कमांडर्समध्ये झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या सैनिकांना सोडून दिलं होतं.
दरम्यान, भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही देशांच्या सैनिकांमधील हिंसक झडपेत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचेही सैनिक यामध्ये मारले गेल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र यामध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त चीनकडून सातत्याने नाकारण्यात येत होते. मात्र आता चिनी सरकारने या झटापटीत चार सैनिक मारले गेल्याचे कबूल केले असून त्यांची नावे देखील जाहीर केली आहे.
15 जूनच्या रात्री नेमकं काय घडलं?
भारत आणि चीनमध्ये 6 जून रोजी मेजर जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. यामध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली होती. 6 जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. घटनास्थळी भारतीय जवानांची संख्या चीनच्या सैनिकांच्या तुलनेने कमी होती. यावेळी चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि टोकदार हत्यारांना भ्याड हल्ला चढवला. या हल्ल्यात 20 जवान जखमी झाले होते. त्यानंतर आज सकाळी भारतीय लष्कराने एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली होती. यामध्ये कर्नल संतोष बाबू, हवालदार पालानी आणि कुंदन झा यांचा समावेश होता.
गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ दोन्ही सैन्यात बातचित सुरु होती. चीनी सैनिकांच्या हल्यानंतर भारतीय सैनिकांनीही प्रत्युत्तर देत हल्ला चढवला. यामध्ये चीनचे 45 सैनिक मारले गेल्याचा दावा भारताने केला होता.