India China : भारत-चीन तणाव पुन्हा वाढणार? पॅंगॉन्ग तलावावर चीनकडून दुसऱ्या पुलाचं बांधकाम सुरू
India China : भारत आणि चीन यांच्या दरम्यान तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सॅटेलाईट काढलेल्या फोटोंमध्ये चीन पँगाँग त्सो लेकजवळ बांधत असलेला दुसरा पूल दिसत आहे.
India China : पूर्व लडाखमधील पॅंगॉन्ग त्सो तलावाभोवती चीन दुसरा मोठा पूल बांधत असल्याचं समोर आलंय. हा भाग चीनच्या ताब्यात आहे. सॅटेलाइट फोटोंवरून ही बाब उघडकीस आली आहे. भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण कायम आहे, अशातच चीनने हा पूल बांधला आहे.
डेट्रस्फाने जी सॅटेलाईट इमेज जारी केली आहे, त्यानुसार हा दुसरा पूल पहिल्या पुलाच्या जवळ आहे. दुसरा पूल पॅंगॉन्ग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणेकडून बनवण्यात येणार आहे. हा पूल पहिल्या पुलाच्या अगदी जवळ आहे. याचे काम चीनने काही दिवसांपूर्वी पूर्ण केले होते. या विषयी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले, पुलासंदर्भात मी रिपोर्ट पाहिला आहे. हा सैन्याचा मुद्दा आहे. यावर मी काही बोलणार नाही. परंतु या भागाला आम्ही भारताचे अधिकृत क्षेत्र मानतो. या विषयी आम्ही चिनशी बोलत असून यातून समाधनकारक उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान असे मानले जाते की, चीनी सैनिक येण्या-जाण्यासाठी वेगवेगळ्या पुलांचा वापर करत आहे. किंवा एक पूल सैनिकांसाठी आणि दुसरा पूल टँक, आर्मी पर्सनल कॅरिअर (एपीसी) आणि दुसरा आर्मीच्या वाहनांसाठी वापरण्यात येण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी भारत-चीन सैन्यात संघर्ष
संपूर्ण जगात कोरोनाचा हाहा:कार उडाला असताना चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली होती. पॅंगॉन्ग तलावाजवळ असणाऱ्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर वाद झाला होता. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या सीमावादामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात बांधकाम करण्यास आक्षेप घेतला जातो. दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्याकडून आपल्या हद्दीत रस्ते बांधणीचे काम सुरू केले होते. त्यावर चीनने आक्षेप घेतला होता. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता. त्याच्या काही दिवसांनी चीनच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने चीनच्या आगळकीला विरोध केला. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैन्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारताच्या 20 जवानांनी प्राणांची आहुती दिली. तर, चीनचेही काही सैन्य ठार झाले होते.