Relief For Mehul Choksi: फरार मेहुल चोक्सीला मोठा दिलासा, डॉमिनिक सरकाराने सर्व खटले घेतले मागे
Relief For Mehul Choksi: पीएनबी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला मोठा दिलासा मिळाला आहे. डॉमिनिकामध्ये बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी त्याला दिलासा मिळाला आहे.
Relief For Mehul Choksi: पीएनबी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला मोठा दिलासा मिळाला आहे. डॉमिनिकामध्ये बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी त्याला दिलासा मिळाला आहे. डॉमिनिका प्रशासनाने त्याच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. डॉमिनिकाच्या सरकारी वकिलांनी 17 मे रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बेकायदेशीर प्रवेशासाठी मेहुल चोक्सीविरुद्ध दाखल केलेला खटला मागे घेण्यात येत आहे. हे प्रकरण मागील वर्षातील मे महिन्यातील आहे. तत्पूर्वी, पंजाब नॅशनल बँकेला (PNB) 13,500 कोटी रुपयांची फसवणूक करून तेथील नागरिकत्व घेऊन चोक्सीने तपासापासून बचाव करण्यासाठी अँटिग्वा आणि बारबुडा येथे पळ काढला होता. त्यांचा भाचा नीरव मोदी या प्रकरणात सहआरोपी आहे.
चोक्सीला डॉमिनिका उच्च न्यायालयाने 51 दिवसांनंतर जामीन मंजूर केला. यादरम्यान भारताने त्याला परत देशात आणण्याचे प्रयत्न केले आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) पथक खाजगी विमानाने तिथे तळ ठोकून होते. चोक्सीच्या वकिलाने मात्र आरोप केला की, भारतीय दिसणाऱ्या लोकांनी त्याचे अँटिग्वा येथून अपहरण केले आणि त्याला डॉमिनिका येथे आणले.
चोक्सीच्या वकिलाने दिली ही माहिती
चोक्सीच्या वकिलाने सांगितले की, डॉमिनिकामधील बेकायदेशीर प्रवेशाच्या सर्व प्रकरणांमधील कार्यवाही 20 मे रोजी मागे घेण्यात आली. प्रवक्त्याने सांगितले की, "डोमिनिका सरकारने मे 2021 मध्ये बेकायदेशीर प्रवेशाचे सर्व आरोप मागे घेतल्याने चोक्सी आनंदी आहे.'' वकिलाने सांगितले की, "चोक्सीला भारतातील एजंट्सनी त्याच्या इच्छेविरुद्ध अँटिग्वामधून बळजबरीने बाहेर काढले. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि बोटीतून डॉमिनिका येथे नेण्यात आले, जिथे त्यांनी न केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांना बेकायदेशीरपणे अधिकार्यांकडे सोपवण्यात आले."
2018 मध्ये PNB घोटाळा उघड झाला
2018 मध्ये पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग्जच्या मदतीने बँकांना हजारो कोटींची फसवणूक केली आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोघे काका-पुतणे देश सोडून पळून गेले. मेहुल चोक्सी हा नीरव मोदीचा मामा आहे आणि तो गीतांजली जेम्सचा प्रवर्तक आहे. कॅपिटल मार्केट्सने चोक्सीवर वर्षभरासाठी बंदी घातली आहे.