नवी दिल्ली : संकटाच्या काळात सकारात्मक राहण्यासाठी गूगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी अत्यंत सुरेख संदेश दिला आहे. पिचई यांनी विद्यार्थांना संबोधित करताना आशावादी बनण्याचा, मोकळे विचार ठेवण्याचा आणि कोणतंही काम करण्यासाठी उत्सुक राहण्याचा सल्ला दिला आहे.


कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. अशातच गूगल सीईओ सुंदर पिचई यांनी खास संदेश दिला आहे. त्यांनी जगभरातील विद्यार्थांना व्हर्च्युअल पदवीधर सोहळ्यामार्फत संबोधित केलं. त्यावेळी बोलताना सुंदर पिचई यांनी आपल्या भूतकाळाच्या आठवणी ताज्या करत संकटाच्या काळात सकारात्मक राहण्याचं महत्त्व सांगितलं आहे. त्यांनी भारत सोडताना त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या समस्यांबाबतही बोलताना सांगितलं.


सुंदर पिचई यांनी सांगितलं संकटांचा सामना कसा करावा


सुंदर पिचई यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला असून ते म्हणाले की, 'माझ्या वडिलांनी स्टँडफोर्डमधील शिक्षणासाठी जाताना माझ्या विमानाच्या तिकीटावर त्यांचा एक वर्षांचा पगार खर्च केला होता. विमानाने केलेला हा माझा पहिला प्रवास होता. अमेरिका फार महागडं शहर होतं. घरी फोन केल्यानंतर प्रति मिनिटासाठी 2 डॉलर खर्च करावे लागत होते.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'माझ्याकडे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सुविधाही नव्हत्या. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत आमच्याकडे टेलिफोनही नव्हता.'


जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितली यशाची कहाणी


सुंदर पिचई यांनी सांगितले की, 'अमेरिकेला जाईपर्यंत अभ्यासासाठी माझ्याकडे कम्प्युटरही नव्हता. जेव्हा आमच्याकडे टिव्ही आला, त्यावेळी त्यावर फक्त एकच चॅनल दिसत होतं.' दरम्यान, सुंदर पिचई चेन्नईमध्ये राहत होते. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात इंजिनियर म्हणून केली होती. गूगलमध्ये त्यांनी मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून 2004मध्ये कामाला सुरुवात केली. त्यानंतर आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर ते गूगलच्या सीईओ पदापर्यंत पोहोचले. सुंदर पिचई ज्या कार्यक्रमात विद्यार्थांना संबोधित करत होते. या कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्या व्यतिरिक्त अनेक दिग्गज उपस्थित होते.


संबंधित बातम्या : 


न्यूझीलंड देश कोरोनामुक्त, पंतप्रधान जसिंडा अर्डेन यांची घोषणा

चिनी वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग, बहिष्काराची मोहीम अपयशी ठरेल; चीनने भारताला खिजवलं


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ट्विटरवर का ट्रेण्ड होतोय?


'लांसेट'ने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनबाबत अभ्यास मागे घेतला, 200 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं!