इस्लामाबाद : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे. याचं कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिमचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची चर्चा. मुंबई साखळी स्फोटाचा मास्टरमाईंड आणि मुंबईतील डी कंपनीचा म्होरक्या दाऊदचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा रंगली आहे. परंतु भारत सरकारने याला दुजोरा दिलेला नाही.


दरम्यान गुप्तचर यंत्रणाचा दाखल देत दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त काल (5 जून) प्रकाशित होतं. या वृत्तानुसार, उपचारांसाठी त्यांना कराचीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसंच दाऊदचा खासगी स्टाफ आणि सुरक्षारक्षकांनाही क्वॉरन्टाईन केलं आहे.


दाऊदची प्रकृती उत्तम : अनीस इब्राहिम
मात्र दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त त्याचा भाऊ अनीस इब्राहिमने फेटाळलं आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, अनीस इब्राहिमने एका अज्ञात ठिकाणावरुन फोन करुन दाऊसह कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रकृती उत्तम असून कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं सांगितलं.


पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली
पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसमुळे आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या बाबतीत पाकिस्तानने काल (5 जून) चीनलाही मागे टाकलं आहे. पाकिस्तानात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 89, 249 पेक्षा जास्त आहे, तर 1838 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सिंध प्रांतात आहेत. इथे रुग्णांची संख्या 33,536 पोहोचली आहे.


दाऊदच्या व्यवसायाची जबाबदारी अनीसकडे
अनीस इब्राहिममच दाऊदची डी-कंपनी चालवतो. याशिवाय यूएईमधील आलिशान हॉटेल आणि पाकिस्तानमधील मोठ्या कंस्ट्रक्शन प्रकल्पांसह ट्रान्सपोर्टचा बिझनेसही अनीस इब्राहिम पाहतो.


मुंबई साखळी स्फोटाचा मास्टरमाईंड
दाऊद इब्राहिम हा 1993 मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे. 13 साखळी बॉम्बस्फोटात 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि 1200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. 2003 मध्ये भारत सरकारने अमेरिकेच्या साथीने दाऊद इब्राहिमला ग्लोबल टेररिस्ट(जागतिक दहशतवादी) घोषित केलं होतं.


पाकिस्तानी सैन्याकडून आश्रय
भारतीय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना घाबरुन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानात आश्रय घेतला आहे. कराचीमध्ये पाकिस्तान आर्मी आणि आयएसआय त्याच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. भारताने अनेकदा पुरावे सादर करुनही पाकिस्तानने कायमच दाऊद आपल्याकडे नसल्याचं पुनरुच्चार केला आहे.