(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Imran Khan : सोन्याची एके-47, आठ कोटींचे घड्याळ, महागड्या भेटवस्तूंमुळे इम्रान खान यांची खासदारकी रद्द
Imran Khan : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. परदेशातून आलेल्या भेटवस्तू चोरून बाजारात विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
Imran Khan : तोशखाना (सरकारी तिजोरी) प्रकरणात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. परदेशातून आलेल्या भेटवस्तू चोरून बाजारात विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, इम्रान खान यांच्यावर फौजदारी खटलाही सुरू केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत गुन्हा सिद्ध झाल्यास इम्रान खान यांना तुरुंगात जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. इमरान खान आता संसद सदस्य नसल्याचंही पाकिस्ताना निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने या मुद्द्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून ते सरकारच्या विरोधात लोकांमध्ये जाणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेत्यांनी माजी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सत्ताधारी पीएमएल-एन नेत्या मरियम नवाज म्हणाल्या की, इम्रान खान आता प्रमाणित चोर असल्याचे सिद्ध झाले आहे.
इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनी तोशाखान्यात जमा न करता वैयक्तिक वापरासाठी कोणत्या भेटवस्तू घेतल्या, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 'नया पाकिस्तान'चा नारा देत इम्रान खान सत्तेवर आले. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी शरीफ आणि झरदारी कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पंतप्रधानांची खुर्ची हिसकावल्यानंतरही त्यांनी शाहबाज शरीफ आणि आसिफ अली झरदारी यांना चोर, बूट पॉलिश करणारे म्हणत त्यांच्यावर टीका केली होती.
इम्रान खान यांनी आपल्या कार्यकाळात भेटवस्तूंचा गैरवापर केल्याचे आता निवडणूक आयोगाने सिद्ध केले आहे. ज्यावेळी इम्रान खान सरकारला परदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा न्यायालयाने ती राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून माहिती देण्यास नकार दिला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही इम्रान खान यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार केल्याचा दावा केला होता. इम्रान खान पंतप्रधान म्हणून परदेशातून मिळालेल्या भेटवस्तू विकून पैसे कमवतात, असे पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच ते म्हणाले होते.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना पाकिस्तान सरकारच्या तिजोरीतून (तोशाखाना) केवळ 4 कोटी रुपये देऊन 14.2 कोटी रुपयांच्या 112 भेटवस्तू मिळाल्या होत्या. यामध्ये सात रोलेक्स घड्याळे, इतर महागडी घड्याळे, आयफोन, सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, महागडे पेन, सोन्याच्या कफ लिंक्स, अंगठ्या, लाखो रुपये किमतीचे डिनर सेट आणि परफ्यूमसह जगातील विविध देशांनी इम्रान खान यांना भेटवस्तू दिल्या होत्या. इम्रान खान यांनी या भेटवस्तू सरकारी तोशाखान्यात जमा न करता आपल्याकडे ठेवल्या होत्या. यातील सर्वात महागडे गिफ्ट म्हणजे सोनेरी रोलेक्स घड्याळ. पाकिस्तान सरकारने त्याची किंमत 8 कोटी 50 लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. हे घड्याळ 18 सप्टेंबर 2018 रोजी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी इम्रान खान यांना दिले होते. हे घड्याळ घेण्यासाठी इम्रान खान यांनी पाकिस्तानी तोशाखानमध्ये फक्त 1 कोटी 70 लाख रुपये जमा केले होते. पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना दिलेली ही सर्वात महागडी विदेशी भेट आहे.
सोन्याची एके-47ही सोबत ठेवली
सौदी क्राउन प्रिन्सने इम्रान खान यांना सोन्याचा मुलामा असलेली कलाश्निकोव्ह (AK-47) देखील भेट दिली आहे. जानेवारी 2019 मध्ये पाकिस्तानला भेट देणारे सौदी अरेबियाचे प्रिन्स फहद बिन सुलतान बिन अब्दुल अझीझ अल सौद यांनी इम्रान खान यांना ही AK-47 दिली होती. या रायफलबद्दल काहीही सापडले नाही. पाकिस्तान सरकारच्या नोंदीनुसार तोशाखान्यात या रायफलची कोणतीही नोंद नाही. करोडो रुपये किमतीची ही रायफल इम्रान खान यांनी आपल्या वैयक्तिक वापरासाठी ठेवली होती. या रायफलचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. मार्च 2022 मध्ये इम्रान खान यांनी पंतप्रधान असताना या भेटवस्तूंची माहिती कर अधिकार्यांपासून लपविल्याचे वृत्त आले होते. सौदीकडून मिळालेल्या सोन्याच्या घड्याळांची माहिती तीन वर्षे लपवून ठेवल्यानंतर इम्रान खान यांनी 2020-21 च्या टॅक्स रिटर्नमध्ये ती सार्वजनिक केली.
भेटवस्तूंचे नियम काय आहेत?
पाकिस्तानमध्ये कोणताही राष्ट्रप्रमुख, राजकारणी किंवा सार्वजनिक पदाचा अधिकारी 10,000 रुपयांपेक्षा जास्त भेटवस्तू सोबत ठेवू शकत नाही. पाकिस्तानच्या गव्हर्नमेंट गिफ्ट डिपॉझिटरी नियमांनुसार, सरकारी तोशाखान्यात विदेशी भेटवस्तू जमा करणे बंधनकारक आहे. तेथून भेटवस्तू खुल्या लिलावात ठेवल्या जातात. तोपर्यंत ती भेट देशाची संपत्ती राहते. एखाद्या नेत्याला 10000 पेक्षा जास्त किंमतीची भेटवस्तू ठेवायची असेल तर अंदाजे किंमत तोषखान्यात जमा करण्याचा नियम आहे. या नियमांचा फायदा घेत इम्रान खानने कमी पैसे देऊन जास्त किंमतीच्या भेटवस्तू ठेवल्या होत्या.